मुंबई,दि.२८(शेखर भोसले)–मराठी भाषा दिनानिमित्त मुलुंड येथील ‘मराठमोळं मुलुंड’ ह्या सामाजिक संस्थेच्या वतीने बुघवार दिनांक २७ फेब्रुवारीला मराठी भाषा दिन प्रसार फेरीचे आयोजन मुलुंड पूर्व येथे करण्यात आले होते. यावेळी मुलुंड पूर्व येथील तरूण उत्कर्ष शाळा, सौ. नलिनी यशवंतराव दोडे हायस्कूल, वामनराव मुरांजन विघालय, इंडियन एजुकेशन सोसायटी स्कूल व आर आर ऐजुकेशन स्कूल या शाळेतील विद्यार्थी, पालक व शिक्षक हे प्रसार फेरीत सहभागी झाले होते. प्रसार फेरीचा शुभारंभ तरुण उत्कर्ष शाळेचे मैदान येथून होवून चिंतामणराव देशमुख उद्यान, स्टेशन रोड, हनुमान चौक, केंपस हॉटेल, मुलुंड जिमखाना, संभाजी मैदान हा मार्ग करत तुंगवतेश्वर मंदिर येथे समाप्ती झाली. या प्रसार फेरी मघ्ये मुलुंडमधील अनेक नागरिक, पत्रकार, डॉक्टर, इंजिनियर, विविध राष्ट्रीय पक्षांचे नेते व कार्यकर्ते तसेच महिला वर्ग मोठ्या संख्येने सहभागी झाला होता.
सकाळी ७ वाजता सुरू झालेली ही मराठी भाषा प्रसार फेरी सकाळी १० वाजता संपली. ह्या कार्यक्रमाचे आयोजन ‘मराठमोळं मुलुंड’चे अध्यक्ष श्री हेमंत मोरे व त्यांच्या कार्यकारी मंडळाने केले होते.कविवर्य श्रीयुत वि वा शिरवाडकर (कुसुमाग्रज) यांचा जन्मदिवस हा मराठी भाषा दिन म्हणून सर्वत्र मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. ह्यावेळी मराठी भाषेच्या उत्कर्षासाठी व मराठी भाषेचा प्रसार सर्वदूर होण्यासाठी निरनिराळे कार्यक्रम विविध सामाजिक संस्थेमार्फत संपूर्ण जगात साजरे केले जातात.





