सुट्टीच्या दिवशी कर्तव्यावर असणाऱ्या पोलिसांना पूर्ण दिवसाचा पगार- मुख्यमंत्री

0
21

मुंबई : कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावी यासाठी पोलीस आपले कर्तव्य काटेकोरपणे बजावित असतात. कर्तव्य बजावत असताना त्यांना सुट्टीच्या दिवशीही काम करावे लागते. या दिवसाचा मोबदला यापूर्वी कमी मिळत होता. यामुळे पोलिसांचे आर्थिक नुकसान होत होते. याचा विचार करुन शासनाने आता सुट्टीच्या दिवशी कर्तव्यावर असणाऱ्या पोलिसांना पूर्ण दिवसाचा पगार देण्याचा निर्णय घेतला आहे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

बृहन्मुंबई पोलीस दलामार्फत आयोजित करण्यात आलेल्या महिला पोलीस अधिकारी व अंमलदार यांचा गौरव समारंभ पोलीस क्लब येथे आज पार पडला, त्यावेळी ते बोलत होते.

राज्यातील जास्तीत जास्त गुन्ह्यांची उकल करण्यामध्ये महिला पोलीसांचा सिंहाचा वाटा आहे. त्या अत्यंत तत्पर व कर्तव्य दक्ष तसेच समाजसेवेच्या भावनेने आपले कर्तव्य बजावत असतात. महिला व बालकांवर होणाऱ्या अत्याचाराविषयीच्या घटना त्या अत्यंत संवेदनशीलपणे हाताळतात, तसेच या आरोपींना कठोरातली कठोर शिक्षा व्हावी यासाठी पाठपुरावा करतात. गुन्हेगारीचे समूळ उच्चाटन करण्यासाठी महिला पोलीस अग्रेसर असलेले दिसतात. त्यांच्या गौरवामुळे समाजामध्ये तसेच इतर महिला पोलिसांमध्ये सकारात्मक संदेश जाईल असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केला.

यावेळी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सरिता भोसले, कल्पना गाडेकर, स्वाती ढोले, अश्विनी म्हस्के, सुजाता पाटील, मनिषा पाटील, अर्चना मांजरेकर या उत्कृष्ट काम करणाऱ्या महिला पोलीस अधिकारी/हवालदार व अंमलदार यांचा प्रशस्तीपत्र देऊन गौरव करण्यात आला. तसेच महिला व मुलींवरील अत्याचार प्रतिबंध यावर आधारित ‘राहत’ या पुस्तकाचे प्रकाशनही मुख्यमंत्र्याच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी मुंबई पोलीस आयुक्त राकेश मारिया, सहाय्यक पोलीस आयुक्त (कायदा व सुव्यवस्था) धनंजय कमलाकर, सहाय्यक पोलीस आयुक्त (मुंबई) अतुलचंद्र कुलकर्णी तसेच पोलीस विभागातील वरिष्ठ अधिकारी व महिला पोलीस अधिकारी उपस्थित होते.