अर्थसंकल्पात त्रुटी असल्यास अधिकाऱ्यांवर कारवाई : मुनगंटीवार

0
16

मुंबई – राज्याच्या अर्थसंकल्पातील आकडेवारीत जर चुका झाल्या असतील तर अधिवेशन संपण्यापूर्वी त्याबाबतची खरी माहिती सभागृहाच्या पटलावर ठेवण्यात येईल आणि चुकीची माहिती पुरवणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल, असा इशारा अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सोमवारी विधानसभेत दिला. विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी याबाबतचा आरोप विधानसभेत केला होता.
अर्थसंकल्पातल्या मुद्द्यांवर झालेल्या चर्चेदरम्यान विखे म्हणाले की, “अर्थमंत्र्यांनी मांडलेल्या अंदाजपत्रकातील परफॉर्मन्स बजेटमधील आकडेवारी विसंगत आहे. आकडेवारी सादर करण्याबाबत अर्थ खात्याचे अधिकारी गंभीर नाहीत. एका वृत्तवाहिनीवरील चर्चेत अर्थ विभागाच्या निवृत्त अधिकाऱ्याने सांगितले की, अर्थसंकल्पात दिलेली आकडेवारी अगदी अचूक नसते. बऱ्याचदा वेळ मारून नेण्यासाठी अशी अंदाजित आकडेवारी पुरवण्यात येते. असा जर अधिकाऱ्यांचा दृष्टिकोन असेल तर ही घोडचूक असून अशा अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची गरज आहे.’ त्यावर हा प्रकार खरा असेल तर गंभीर असून त्यावर भूमिका मांडा, असे निर्देश तालिका सभापतींनी सरकारला दिले होते.