५६ हजार रुग्णांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून मदत

0
17

मुंबई,,दि.23 :  : राज्यातील गरीब व गरजू रुग्ण केवळ पैशांअभावी वैद्यकीय सेवांपासून वंचित राहू नयेत यासाठी गेल्या साडेचार वर्षात विविध आजारांनी ग्रासलेल्या ५६ हजारांहून अधिक रुग्णांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीच्या माध्यमातून साडेपाचशे कोटी रुपयांची मदत देण्यात आली असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. या मदतीमुळे रुग्णांबरोबरच त्यांचे कुटुंबीय आणि नातेवाईक यांना दिलासा मिळाला आहे.

राज्यातील जनतेला शासकीय रुग्णालयांबरोबरच सध्या आयुष्मान भारत आणि महात्मा फुले जनआरोग्य योजनेखाली वैद्यकीय सेवा देण्यात येतात. या योजनांचा लाभ न मिळू शकणाऱ्या आणि दुर्धर आजारांनी ग्रासलेल्या रुग्णांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून मदत देण्यात येते. मात्र, जनआरोग्य योजनेसाठी पात्र असणाऱ्या रुग्णांचेही अर्ज अलिकडे मुख्यमंत्री सहाय्यता निधीअंतर्गत वैद्यकीय मदतीसाठी येत आहेत. त्यामुळे प्राप्त झालेल्या अर्जांची छाननी करण्यासाठी वेळ लागतो. महात्मा फुले जनआरोग्य योजनेखाली पात्र असलेल्या सर्वांचा प्रीमियम शासनाकडून भरला जातो. त्यामुळे गरजू लोकांवर अन्याय होऊ नये म्हणून छाननी सुरू केली आहे. वैद्यकीय मदतीअभावी कोणीही गरजू रुग्ण वंचित राहू नये याची काळजी सरकार घेत आहे, असेही मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे.

जवळचा एखादा नातेवाईक जेव्हा दुर्धर आजाराने ग्रासला जातो आणि केवळ पैशाअभावी त्याच्यावर उपचार करता येत नाहीत, तो क्षण संपूर्ण कुटुंबासाठीच अत्यंत दु:खद असतो, असे सांगून मुख्यमंत्री म्हणतात, अशी वेळ राज्यातील गरीब रुगांवर येऊ नये आणि गरीब-गरजू रुग्णांवर वेळेत उपचार व्हावेत यादृष्टीने मुख्यमंत्री सहाय्यता निधीच्या माध्यमातून आर्थिक सहाय्य करण्यात येते. केवळ आर्थिक आणि राज्याचा रहिवासी एवढ्याच निकषावर गंभीर आजारांवर उपचारासाठी मदत देण्यात येत आहे. कर्करोग, मेंदू आणि मज्जारज्जू संबंधातील आजार, अर्भकांना लागणारे वैद्यकीय सहाय्य, हृदयरोग, मुत्रपिंड, यकृत प्रत्यारोपण अशा विविध उपचारांसाठी येणाऱ्या वैद्यकीय खर्चाची प्रतिपूर्ती या निधीच्या माध्यमातून करण्यात येते. 

मुख्यमंत्री पुढे म्हणतात, राज्यातील प्रत्येक गरीब व गरजू रुग्णापर्यंत मदत पोहोचावी यासाठी गेल्या चार वर्षात शासनाकडून विशेष प्रयत्न करण्यात आले आहेत. मुख्यमंत्री कार्यालयाच्या स्तरावरुन मदत देण्याबरोबरच राज्यामध्ये आयोजित करण्यात आलेल्या वैद्यकीय शिबिरांमधील रुग्णांना देखील मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून मदत देण्यात आली आहे. शासनाच्या या प्रयत्नांना सामाजिक संस्थांचेही मोठ्या प्रमाणात पाठबळ मिळाले असून त्यांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात आर्थिक मदत दिली जात आहे. यामुळेच गरीब रुग्णांना अत्याधुनिक वैद्यकीय सेवा मिळणे शक्य झाले आहे.

गेल्या पाच वर्षांची तुलना त्यामागील पंचवार्षिकाशी केल्यास त्यात शेकडो पटीने वाढ झाल्याचे निदर्शनास येते. वर्ष २००९ ते २०१४ या दरम्यान सुमारे १६ हजार रूग्णांना ४० कोटी ५६ लाख ९४ हजार ७०० रूपये वितरित करण्यात आले होते, तर १ नोव्हेंबर २०१४ ते २० जून २०१९ या काळात ५६ हजार ३१८ रूग्णांना ५५३ कोटी ९२ लाख १९ हजार ५९८ रूपये वितरित करण्यात आले आहेत. वैद्यकीय शिबिरांमधील रुग्णांचा समावेश केल्यामुळे २०१८-१९ मध्ये १० हजार ५८२ एवढ्या लक्षणीय रूग्णांना १ हजार कोटींहून अधिक सहाय्य दिले गेले आहे. कर्करोगाच्या उपचारासाठी सर्वाधिक म्हणजे ८ हजार ४६८ रूग्णांना सुमारे ९० कोटी रूपयांची मदत देण्यात आली आहे. यापूर्वी गंभीर आजारांसाठी केवळ २५ हजार रूपये वितरित करण्यात येत होते. मात्र, २०१४ पासून यामध्ये वाढ करण्यात आली असून आवश्यक त्या ठिकाणी तीन लाखापर्यंत निधी देण्यात येत आहे. दुर्धर आजाराने ग्रासलेल्या अनेक लहान मुलांचे प्राण या योजनेच्या माध्यमातून वाचविण्यात शासनाला यश आले आहे.