मागास समाजासाठी विविध योजनांचा डॉ.संजय कुटे यांनी घेतला आढावा

0
14

मुंबई, दि. 8 :  धनगर समाजासाठी असलेल्या विविध योजना, तांडा वस्ती सुधार योजना तसेच  राज्य मागासवर्ग आयोग, इतर मागासवर्ग महामंडळ व विमुक्त जाती भटक्या जमाती महामंडळासंदर्भातील कामकाजाबाबत, कामगार, विमुक्त जाती, भटक्या जमाती व इतर मागासवर्ग मंत्री डॉ. संजय कुटे यांनी आज मंत्रालयात आढावा घेतला.विमुक्त जाती व भटक्या जमाती, इतर मागासवर्ग व विशेष मागास प्रवर्ग या विविध प्रवर्गातील समाजाच्या युवक-युवतींसाठी विविध उपक्रम अंमलात आणण्यासाठी सारथीच्या धर्तीवर स्वायत्त संस्था स्थापन करण्याची विधिमंडळात घोषणा केली होती. त्या घोषणेप्रमाणे सर्वंकष अभ्यास करुन शासनास अहवाल सादर करण्यासाठी विजाभज, इमाव विमाप्र कल्याण, कामगार मंत्री यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत करण्यात आली आहे. यात प्रधान सचिव (विजाभज, इमाव व विमाप्र कल्याण), प्रधान सचिव सामाजिक न्याय, संचालक विजाभज, महासंचालक बार्टी, पुणे, संचालक छत्रपती शाहू महाराज संशोधन प्रशिक्षण व मानव विकास संस्था (सारथी), प्रादेशिक उप आयुक्त सामाजिक न्याय,कोकण/ पुणे / नागपूर विभाग हे सदस्य असतील तर उप सचिव विजाभज, इमाव व विमाप्र कल्याण हे सदस्य सचिव म्हणून काम करणार आहेत. या शिवाय समितीस आवश्यक वाटेल त्याप्रमाणे तज्ज्ञ व्यक्ती/संस्था यांची निमंत्रीत म्हणून नेमणूक करण्याचे अधिकार समितीला आहेत.

‘बार्टी’ तसेच ‘सारथी’ या दोन्ही संस्थांमार्फत त्या-त्या लक्षित घटकांसाठी अनेक उपक्रम मोठ्या प्रमाणात राबविण्यात येत आहेत आणि त्यामुळे त्या-त्या घटकांच्या युवक युवतींचा अनेक माध्यमातून विकास घडविला जात आहे. तशाच प्रकारे, विमुक्त जाती व भटक्या जमाती, इतर मागासवर्ग व विशेष मागास प्रवर्ग या विविध प्रवर्गातील समाजाच्या युवक-युवतींसाठी सुद्धा विविध उपक्रम राबवावेत, यासाठी विहीत कार्यपद्धती व उपक्रमांची फलनिष्पत्ती याबाबत सविस्तर अहवाल एक महिन्यात सादर करावा असेही निर्देश डॉ.कुटे यांनी दिले.