आरोग्य सेवा क्षेत्रातील तंत्रज्ञानासाठी कॅनडाचे सहकार्य महत्त्वपूर्ण– मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

0
17

मुंबईदि. २3 : आयुषमान भारत योजना शेवटच्या घटकांपर्यंत पोहचविण्यात येत आहेत्यामुळे आरोग्य सेवा क्षेत्रातील कॅनडाकडील अत्याधुनिक तंत्रज्ञान महाराष्ट्रासाठी पायाभूत सुविधा उभारणीत उपयुक्त ठरेल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. कॅनडाचे भारतातील उच्चायुक्त नादीर पटेल यांनी आज सह्याद्री राज्य अतिथीगृह येथे मुख्यमंत्री श्री.फडणवीस यांची भेट घेतली. या भेटीत मुख्यमंत्री श्री. फडणवीस बोलत होते.

मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले, ‘महाराष्ट्रातील बहुतांश लोकसंख्या आता आरोग्य विमा योजनेशी जोडली गेली आहे. त्यामुळे या मोठ्या लोकसंख्येपर्यंत आरोग्य सेवा पोहचविण्यासाठी पायाभूत सुविधांची मोठी गरज आहे. त्यामुळे या क्षेत्रातील अत्याधुनिक उपकरणे तसेच तंत्रज्ञानासाठी कॅनडातील कंपन्याना मोठी संधी आहे. याशिवाय नागपूर येथे मेडीसिटी उभारणीचा महत्त्वाकांक्षी प्रकल्पही प्रगतीपथावर आहे. त्यामुळे तेथेही या कंपन्यांना गुंतवणूकीची मोठी संधी आहे. याशिवाय दिल्ली-मुंबई औद्योगीक पट्टा – डिएमआयसीच्या विस्तारात नागपूर आणि औरंगाबाद ही शहरे विकासाच्या दृष्टीने महत्त्वपुर्ण असतील. त्यामुळे या ठिकाणीही कॅनडातील कंपन्यांची गुंतवणूक करता येईल.

कॅनडाचे उच्चायुक्त श्री. पटेल यांनी कॅनडा आणि भारतातील सौहार्दपुर्ण संबंध वृद्धिंगत करण्यात महाराष्ट्रातील विविध क्षेत्रातील गुंतवणूक महत्त्वपुर्ण ठरेल,असा  विश्वास व्यक्त केला. महाराष्ट्र हे कॅनडासाठी शिक्षणआरोग्यकृषी-तंत्रज्ञान या क्षेत्रातील सहकार्यासाठी नेहमीच महत्त्वाचे राज्य ठरल्याचेही त्यांनी नमूद केले. यामुळे कॅनडातील अनेक कंपन्यांनी महाराष्ट्रात गुंतवणूकीस प्राधान्य दिल्याचेही श्री. पटेल यांनी सांगितले. यावेळी श्री. पटेल यांनी मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊन अभिष्टचिंतनही केले. तसेच कॅनडा भेटीचे निमंत्रणही दिले.यावेळी मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव भूषण गगराणीमुख्य राजशिष्टाचार अधिकारी नंदकुमार आदी उपस्थित होते.