24.5 C
Gondiā
Wednesday, July 29, 2026
Home महाराष्ट्र विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन प्रश्नोत्तराच्या तासाशिवाय चालणार

विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन प्रश्नोत्तराच्या तासाशिवाय चालणार

0
28

नागपूर(वृत्तसंस्था)दि.६ – महाराष्ट्र विधिमंडळाच्या १६ डिसेंबरपासून नागपुरात सुरू होणाऱ्या अधिवेशनात प्रश्नोत्तराचा तास राहणार नसल्याची माहिती समोर आली आहे. प्रश्नोत्तराच्या तासासाठी आमदारांकडून प्रश्न मागवणे, त्यावर विविध विभागांमध्ये काम, विधिमंडळ सचिवालयास त्यावर प्रक्रिया करण्यासाठी लागणारा कालावधी अशा विविध प्रक्रियांसाठी कालावधीच शिल्लक नसल्याने प्रश्नोत्तराचा तास राहणार नसल्याचे संकेत विधिमंडळ सचिवालयाने दिले आहेत.

विधानसभा व परिषदेत प्रश्नोत्तरांच्या तासांना महत्त्व आहे. यानिमित्ताने आमदारांना मतदारसंघातील प्रश्न उपस्थित करून तो सोडवून घेण्याची संधी मिळत असते. त्यासाठी महिनाभर अगोदर आमदारांकडून सचिवालयाकडे प्रश्न टाकले जातात. मात्र, सध्याच्या राजकीय परिस्थितीमुळे ही प्रक्रियाच सुरू होऊ शकली नाही. दुसरीकडे महाविकास अाघाडीचे मंत्रीही अद्याप खात्याविना आहेत. मंत्रिमंडळाच्या विस्तार केव्हा यावरही प्रश्नचिन्ह आहे. महत्त्वाचे म्हणजे अधिवेशनाला दहा दिवसांचा कालावधी शिल्लक असताना आता ही प्रक्रिया राबवणे शक्य नसल्याचे विधिमंडळ सचिवालयातील सूत्रांचे म्हणणे आहे. त्यामुळेच प्रश्नोत्तराचा तास होणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. शिवसेनेचे ज्येष्ठ नेते व माजी मंत्री दिवाकर रावते यांनी प्रश्नोत्तराचा तास होणार नसल्याचे स्पष्टच सांगितले. तर विधिमंडळाचे प्रधान सचिव भागवत यांनी तशी शक्यता कमी असल्याचे सांगितले. येत्या दोन दिवसात होणाऱ्या कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत त्यावर शिक्कामोर्तब होऊ शकते, असेही संकेत त्यांनी दिले.