येत्या 1 ऑगष्टला एलबीटी हटविणारच- मुख्यमंत्री

0
14

नागपूर,दि.2- : येत्या 1 ऑगष्ट 2015 रोजी स्थानिक संस्था कर (LBT) हटविणारच. तसेच एल.बी.टी हटाव आंदोलनादरम्यान व्यापाऱ्यांवर दाखल झालेले नोव्हेंबर 2014 पर्यंतचे गुन्हेसुध्दा परत घेण्यात येतील, असे ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

सिव्हील लाईन्स येथील नाग विदर्भ चेंबर्स ऑफ कॉमर्सतर्फे आयोजित सत्कार समारंभात मुख्यमंत्री बोलत होते. यावेळी व्यासपीठावर राज्यसभा खासदार अजय संचेती, महापौर प्रवीण दटके, चेंबर्सचे अध्यक्ष मयुर पंचमतिया, सचिव मनुभाई सोनी उपस्थित होते.

फ्रान्स आणि जर्मनीच्या दौऱ्यात तेथील उद्योजकांना महाराष्ट्रात तथा विदर्भात गुंतवणूक करण्याचे त्यांना आवाहन केले. त्यांनी याबाबत उत्सुकता दाखविली असून नागपुरात गुंतवणूक करणार असल्याचे ही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

विदर्भात कृषीवर आधारित उद्योग सुरु करण्यात येणार आहे. शेतकऱ्यांच्या कृषी मालावर उत्पादन करणाऱ्या कंपनीने रशियाच्या सरकारी कंपनीबरोबर सामंजस्य करारावर सह्या केल्या आहेत. नागपूर जी.एस.टीचे केंद् बनेल. विविध प्रकारच्या कंपन्या विदर्भात येणार आहेत. 5 लाख शेतकऱ्यांकडून या कंपन्या सरळ माल विकत घेतील, शेतकऱ्यांची ही संख्या 25 लाखापर्यंत वाढेल अशी माहितीही मुख्यमंत्र्यांनी दिली.

महाराष्ट्रातील कृषी उत्पन्न बाजार समित्यांना अधिक सक्षम करण्याचा शासनाचा प्रयत्न आहे. त्यामुळे त्या खुल्या स्पर्धेत उतरतील. राज्यात व्यापार वाढला तर शासनाच्या तिजोरीत पैसा येईल. परत एकदा नागविदर्भ चेंबर्स ऑफ कॉमर्समध्ये येईल, तेव्हा विस्ताराने आपणासोबत चर्चा करीन. असे आश्वासनही त्यांनी दिले.

अध्यक्ष मयुर पंचमतिया यांनी मुख्यमंत्र्यांना मागण्यांचे निवेदन दिले. यावेळी खासदार अजय संचेती यांचेही भाषण झाले. समारंभास आमदार सर्वश्री सुधाकर देशमुख, डॉ.मिलिंद माने, सुधाकर कोहळे, कृष्णा खोपडे, समीर मेघे तसेच जयप्रकाश गुप्ता उपस्थित होते.