पानसरेंच्या हत्येचा तपास योग्य दिशेने- मुख्यमंत्री

0
11

कोल्हापूर – ज्येष्ठ नेते ऍड. गोविंद पानसरे यांची हत्या प्रकरणाचा आढावा मी घेतला आहे. पोलिसांचा तपास योग्य दिशेने सुरू असून लवकरच गुन्हेगारांना पकडले जाईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज (रविवार) सांगितले.राज्यातील दुष्काळी भाग कायमस्वरुपी दुष्काळमुक्त व्हावा यासाठी राज्य शासनाने जलयुक्त शिवाराची संकल्पना पुढे आणली आहे. मराठवाडा, विदर्भ, उत्तर महाराष्ट्र, कोकण आणि पश्‍चिम महाराष्ट्रातील दुष्काळी भाग यावरच भर देवून समतोल विकास साधण्याचा शासन प्रयत्नशील आहे. यामध्ये भानगडी केल्यास संबंधितांवर कडक कारवाई करू, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

आज सकाळी त्यांनी पत्रकारांशी मुक्त संवाद साधत विविध प्रश्‍नांना उत्तरे दिली. कोल्हापूरात झालेल्या प्रदेश कार्यकारिणीच्या बैठकीला उत्तम प्रतिसाद मिळाला. कोल्हापूरकरांनी आमचे चांगले स्वागत केल्याचे सांगून या बैठकीतून निश्‍चित काही चांगल्या गोष्टी निष्पन्न झाल्या आहेत. शासनाने घेतलेले निर्णय पदाधिकाऱ्यांपर्यंत पोहोचल्या असून त्या आता कार्यकर्त्यांच्या माध्यमातून जनतेपर्यंत पोहोचतील. डोळ्यावर पट्टी बांधून पत्रकार उगीचच टिका करतात. याबद्दल त्यांनी खंत व्यक्त केली. विदर्भातील आणि विदर्भवादी असलो तरी पश्‍चिम महाराष्ट्रावर अन्याय होणार नाही. मुख्यमंत्री म्हणून मी सर्व महाराष्ट्रावर प्रेम करतो. राज्य दुष्काळमुक्त व्हावे यासाठी सिंचनासाठी जलयुक्त शिवार योजनेची संकल्पना पुढे आणली आहे. एकट्या सांगोला तालुक्‍यासाठी 109 कोटी रुपयांची तरतुद केली आहे. याशिवाय जलशिवारमधूनही 250 कोटी रुपये मिळतील. शेवटी विदर्भ, मराठवाडा यांच्यासह महाष्ट्राचा समतोल विकास करण्याचा प्रयत्न आहे.

घटक पक्षांना लवकरच न्याय देणार असे सांगून ते म्हणाले, मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत युती व्हावी अशी इच्छा आहे. कोणत्याही निवडणुकीत युती करावी असेच आमचे धोरण आहे. पण, जिल्हा स्तरावरील परिस्थिती लक्षात घेवून निर्णय घ्यावे लागतात. पक्षातील सर्वसामान्य उपेक्षित कार्यकर्त्यांना चांगली संधी देण्याचाही प्रयत्न असल्याचेही त्यांनी एका प्रश्‍नाला उत्तर देताना सांगितले.आर्थिक पहाणी अहवालानुसार सर्वात जास्त गुंतवणूक गुजरातमध्ये होताना दिसते. महाराष्ट्र दुसऱ्या क्रमांकावर आहे. दोन महिन्यात गुंतवणूकीच्या बाबतीत महाराष्ट्र क्रमांक एकवर जाईल. आणि तो एकवरच असावा अशी आपली इच्छा असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी जिल्हाध्यक्ष महेश जाधव, केशव उपाध्ये, राहूल चिकोडे यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते.