नक्षलवाद्यांच्या कसनसूर दलम कमांडरला अटक

0
7

गडचिरोली दि.2४- नक्षलवाद्यांच्या कसनसूर दलम कमांडरला पोलिसांनी काल अटक केल्याची माहिती जिल्हा पोलिस अधीक्षक संदीप पाटील यांनी सायंकाळी दिली. ऋषी ऊर्फ महादेव नळगू गावडे (वय 48) असे या कमांडरचे नाव असून, न्यायालयाच्या आदेशानुसार त्याला 14 दिवसांच्या पोलिस कोठडीत ठेवण्यात आले आहे. त्याच्यावर दोन लाख रुपयांचे बक्षीस होते.

मूळचा धानोरा तालुक्‍यातील पेंढरी परिसरातील संबलपूर येथील रहिवासी असलेला ऋषी ऊर्फ महादेव नळगू गावडे हा 2005 मध्ये नक्षलवादी चळवळीत दाखल झाला. सुरवातीला तो चातगाव दलममध्ये सदस्य म्हणून काम करीत होता. नंतर त्याला कसनसूर दलम कमांडर म्हणून नियुक्‍त करण्यात आले होते. 2008 पासून तो ही जबाबदारी सांभाळत होता.

विविध गुन्ह्यांत त्याचा सहभाग आढळून आला. पोलिसांसोबत झालेल्या अनेक चकमकींसह भूसुरुंग स्फोट, ग्रामपंचायत जाळपोळ आदी प्रकरणांतही तो सहभागी होता, असे पोलिस तपासात दिसून आले आहे. काल जिल्हा पोलिस दलाचे विशेष अभियान पथक व केंद्रीय राखीव पोलिस दल संबलपूर जंगल परिसरात अभियान राबवीत असताना महादेव घरी असल्याची माहिती मिळाली. त्याआधारे पोलिसांनी सापळा रचून महादेवला अटक केली. महादेववर दोन लाखांचे बक्षीस होते. त्याला 14 दिवसांच्या पोलिस कोठडीत ठेवण्यात आले आहे.