पीक विमा काढणार, उपग्रहाच्या मदतीने

0
10

मुंबई दि.२८- राज्यातील शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी आणि त्यांचे आर्थिक नुकसान भरून काढण्यासाठी पीक विमा काढण्यात येणार आहे. हा विमा उपग्रहाच्या मदतीने काढण्यात येणार असून सध्या प्रायोगिक तत्त्वावर ५०० गावांमध्ये ही योजना राबवण्यात येणार आहे. अशा प्रकारचा उपक्रम राबवणारे महाराष्ट्र हे देशातील पहिलेच राज्य ठरणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

मुंबईतील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान सभागृहात आयोजित राज्यस्तरीय खरीप आढावा बैठकीनंतर ते पत्रकारांशी बोलत होते. या वेळी त्यांच्यासोबत कृषिमंत्री एकनाथ खडसे यांची उपस्थिती होती.

२०५९ हवामान केंद्रांची उभारणी
गेल्या काही वर्षांमध्ये पावसाचा अचूक अंदाज वर्तवण्यात न आल्याने शेतकऱ्यांनी लावलेली अनेक पिके वाया गेली. त्यामुळे त्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. याची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी राज्यात हवामानाची आणि पावसाची माहिती देणाऱ्या २०५९ हवामान केंद्रांची उभारणी करण्यात येणार असून त्यासाठी निविदा मंडल स्तरावर मागवण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.

या हवामान केंद्रांमुळे राज्यातील शेतकऱ्यांना आगामी काळात हवामान कसे राहील, पाऊस किती पडेल याची मिळणार असून ही माहिती त्यांना तीन दिवस आधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. ही माहिती गाव आणि तालुका पातळीवर पोहोचवण्यासाठी ग्रामपंचायत आणि तहसील कार्यालयाच्या आवारात एलईडी स्क्रीन, केऑस तंत्रज्ञान प्रणालीचा वापर करून स्वयंचलित यंत्रणेच्या माध्यमातून ही माहिती शेतकऱ्यांना देण्यात येणार असल्याचे फडणवीसांनी सांगितले.