आता ६० व्या वर्षी डॉक्टरांची निवृत्ती

0
6

मुंबई दि.४: डॉक्टरांचा शासकीय रुग्णालयात तुटवडा जाणवू लागल्यामुळे डॉक्टरांच्या निवृत्तीच्या वयात २ वर्षांची वाढ करण्यात आली असून या पुढे सरकारी डॉक्टरांचे निवृत्तीचे वय ५८ वर्षांवरून ६० वर्षे इतके होईल. या संबंधीच्या प्रस्तावाला मंत्रिमंडळाने मान्यता दिली असल्याची माहिती आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांनी दिली आहे.

याचा फायदा राज्यातील सुमारे ११ हजार सरकारी डॉक्टरांना होणार आहे. प्राथमिक आरोग्य केंद्राचे आरोग्य अधिकारी ते राज्याचे आरोग्य संचालक यांना हा निर्णय लागू असणार आहे. सध्या राज्यात तब्बल ३६ टक्के डॉक्टरांची पदे रिक्त आहेत. सरकारी डॉक्टर होण्यास आणि त्यातल्या त्यात ग्रामीण भागात जाण्यास नवीन पिढी तयार नाही त्यामुळे सरकारी रुग्णालयांत डॉक्टरांची कमतरता निर्माण झाल्यामुळे रुग्णसेवेवर त्याचा परिणाम दिसून येत होता त्यामुळे बाहेरील डॉक्टरांना सरकारी सेवेत घेण्याऐवजी सेवेतील डॉक्टरांचेच निवृत्तीचे वय वाढविण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांनी सांगितले. ३१ मे २०१५ रोजी निवृत्त होणा-या ४१ डॉक्टरांना या निर्णयाचा फायदा होणार आहे