मंत्रिमंडळ विस्तारास जूनअखेरचा मुहूर्त, 9 मंत्री घेणार शपथ

0
6

मुंबई,-दि. १७ – राज्यातील देवेंद्र फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळ विस्ताराला मुहूर्त मिळाल्याची जोरदार चर्चा पुन्हा एकदा सुरु झाली आहे. जून महिना अखेरीस राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार करण्यात येत असल्याचे भाजपकडून संकेत मिळाले आहेत. या विस्तारात मित्रपक्षांनाही स्थान देण्यात येणार असल्याचे कळते आहे. भाजपचे 5, शिवसेनेचे 2 आणि मित्रपक्षांचे दोन मंत्री शपथ घेतील असे कळते आहे. याचबरोबर महामंडळावरील नियुक्त्याही त्यासोबत करण्यात येणार आहेत. राज्यात एकून 33 महामंडळे असून त्यातील भाजपला 20, शिवसेनेला 8 तर मित्रपक्षांना 5 महामंडळे दिली जाणार असल्याचे भाजपमधील सूत्रांचे म्हणणे आहे.
भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी विधीमंडळाचे अधिवेशन संपल्यानंतर मंत्रिमंडळाचा विस्तार होणार असल्याची माहिती दिली होती. मात्र त्याला अद्याप मुहूर्त सापडला नव्हता. आता पुन्हा जुलै महिन्यात अधिवेशन सुरु होईल. मात्र, त्यापूर्वी मंत्रिमंडळ विस्तार करण्याचा भाजपने ठरविल्याचे दिसत आहे. मिळालेल्या ताज्या माहितीनुसार, या महिनाअखेरीस 9 मंत्री शपथ घेतील. यात भाजपचे 5, शिवसेनेचे 2 तर मित्रपक्षांचे 2 नेत्यांचा समावेश असेल.
फडणवीस यांच्या सरकारमधील मंत्र्यांची संख्या सध्या 30 आहे, ती 39 इतकी होईल. भाजप व शिवसेनेतील नव्या मंत्र्यांची नावे अद्याप समोर आली नाहीत. मात्र, राष्ट्रीय समाज पक्षाचे महादेव जानकर आणि शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष सदाभाऊ खोत यांना मंत्रिमंडळात स्थान मिळणार असल्याचे कळते. जानकरांना कॅबिनेट तर खोत यांना राज्यमंत्रीपद दिले जाईल अशी चर्चा आहे. आमदार विनायक मेटे यांची केवळ महामंडळावर बोळवण होण्याची शक्यता आहे. शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे यांच्याकडे अरबी समुद्रातील शिवस्मारक समितीचे अध्यक्षपद देऊन त्यांना खुश करण्याचा प्रयत्न केला आहे.