अपुऱ्या कर्मचाऱ्यांमुळे पावसाळ्यात अंधाराचे सावट

0
11

आमगाव दि. १७ : येथील महावितरण कार्यालयाच्या गैरव्यवहाराच्या अनेक सुरस कथा बाहेर येत असताना, पदभरतीचाही शाप हे कार्यालय भोगत असल्याचे पुढे आले आहे. 80 गावांचा कारभार 17 लाइनमनला सांभाळण्याची वेळ आल्याने ग्राहकांच्या तक्रारीवर वेळेत उपाययोजना होत नाही. पावसाळ्यात तीन फीडरअंतर्गत असलेल्या गावांत अंधाराचे सावट पसरण्याची शक्‍यता आहे.

सद्य:स्थितीत 15 लाइनमनची पदे रिक्‍त आहेत. कित्येक वर्षांपासून पदभरतीच झाली नाही. येथील महावितरणच्या कार्यालयाने अधीक्षक कार्यालयाला पदभरतीचा ठराव अनेकदा पाठविला. तसे स्मरणपत्रही दिले; परंतु लाइनमनची पदे भरण्यात आली नाही. तालुक्‍यात बहुतांशी शेतकऱ्यांकडे सिंचनाची सोय आहे. तसेच मामा तलाव आणि धरणाचे पाणी मिळत असल्याने वीजजोडणीची संख्या वाढली आहे. अशा वेळी प्रकरण मंजूर झाल्यानंतर कार्यालयातच संबंधित शेतकऱ्यांचे वीजजोडणीचे साहित्य पडून राहते. दैनंदिन तक्रारींचे निराकरण करण्यातच वेळ जात असल्याने लाइनमनच्या शेड्युल्डमध्ये हे काम असूनही तो पोहोचत नसायचा. कामे अधिक आणि पदे कमी, असा कारभार महावितरणाचा झाला आहे. एक शाखा अभियंता, एक सहायक अभियंता, तीन कनिष्ठ अभियंते कर्तव्यावर आहेत. अधूनमधून एखादा कर्मचारी सुटीवर गेल्यास दुसऱ्याकडे भार सोपवावा लागतो. कार्यालयीन कामकाज आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बैठकाही शाखा अभियंत्यांना पूर्ण कराव्या लागतात. त्यामुळे खऱ्या अर्थाने दोन ते तीनच कर्मचारी कार्यालयात ग्राहकांच्या तक्रारी ऐकून घेण्यासाठी असतात. काही शेतकरी आल्यापावलीच परत जातात. कार्यालयात तक्रारबुक ठेवले असते. तिथे नोंद करण्याची सोय आहे. त्याचीही दुरवस्था आहे. तालुक्‍यात कट्टीपार/कालीमाटी, आमगाव आणि रिसामा हे तीन महत्त्वपूर्ण फीडर आहेत. आठवड्यातून कोणतीना कोणती समस्या सुरूच असते. तिथे भेटी देणे गरजेचे आहे. अन्यथा शेतकऱ्यांच्या शेतीला पाणी मिळत नाही. काही गावे अंधारात राहण्याची शक्‍यताही स्पष्ट असते.