शिक्षण मंत्री तावडेंची पदवी बोगस असल्याचा आरोप

0
13

मुंबई, दि. २२ – सध्या राजकीय नेत्यांच्या पदवीवरून रणधुमाळी माजलेली असताना, आता खुद्द महाराष्ट्राचे शालेय शिक्षणमंत्रीच वादाच्या भोव-यात सापडले आहेत. शालेय शिक्षण मंत्री विनोद तावडे यांची इंजिनीअरिंगची पदवी ज्ञानेश्वर विद्यापीठ येथून घेतलेली असून या विद्यापीठाला शासनमान्यता नव्हती त्यामुळे तावडे यांची डिग्रीच बोगस होती असा आरोप होत आहे.
खुद्द तावडे यांनीही आपली डिग्री शासनमान्य नसल्याचे सांगताना, प्रतिज्ञापत्रात ही पदवी ज्ञानेश्वर विद्यापीठाची असल्याचे स्पष्ट नमूद केले आहे, त्यामुळे यात कुठलीही फसवणूक केलेली नाही असा दावा केला आहे. मात्र, ज्या विद्यापीठाला शासनमान्यता नाही, अथवा ज्या पदवीला मुंबई वा पुणे अथवा तत्सम अधिकृत विद्यापीठाचीच मान्यता नाही ते शिक्षण मूळातच पदवी म्हणवून घेऊ शकते का असा प्रश्न निर्माण झाला आहे.
आत्तापर्यंत स्मृती इराणी, जितेंद्र तोमर, छगन भुजबळ, बबन लोणीकर अशा अनेक नेत्यांच्या पदवीवरून आणि त्यांनी सादर केलेल्या प्रमाणपत्रावरून बराच गदारोळ माजला आहे. आता खुद्द महाराष्ट्राचे शालेय शिक्षण मंत्रीच पदवीवरून वादाच्या भोव-यात सापडण्याची चिन्हे आहेत.

दरम्यान, विनोद तावडे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले की, पुण्याच्या ज्ञानेश्वर विद्यापीठाचा मी विद्यार्थी आहे. मला त्याचा गर्व आहे. त्या विद्यापीठात मी घेतलेली पदवी कधीही लपवलेली नाही. माझ्या प्रतिज्ञापत्रात ही पदवी मी स्पष्टपणे लिहिलेली आहे.