पाच वर्षात अवघी ३३० रुपये भाववाढ

0
18

गोंदिया दि. 20: शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबविण्याची आणि शेतमालाला उत्पादन खर्चापेक्षा जास्त हमीभाव देण्याची ग्वाही देत सत्तेवर आलेल्या केंद्र सरकारने सलग दुसऱ्या वर्षीही धानाच्या हमीभावात अवघी ५० रुपये वाढ केली आहे. गेल्या पाच वर्षात धानाला ३३० रुपये भाववाढ मिळाली असून त्यात गेल्या दोन वर्षात सर्वात कमी भाववाढ मिळाल्याचे दिसून येते.

एकीकडे उत्पादनाचा खर्च वाढत आहे. बियाणे, कीटकनाशकांच्या किमतीसह मजुरीचे दर वाढत आहेत. मात्र त्या तुलनेत हमीभावात अपेक्षित भाववाढ केल्या जात नाही. केंद्रात सत्तारूढ झालेल्या भाजप सरकारने सलग दुसऱ्या वर्षीही धानाला अवघी ५० रुपये प्रतिक्विंटल भाववाढ देऊन शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसल्याची भावना धान उत्पादकांमध्ये निर्माण झाली आहे.

पाच वर्षांपूर्वी म्हणजे २०११-१२ या हंगामात धानाचे भाव (जनरल ग्रेड) प्रतिक्विंटल १०८० रुपये होते. २०१२-१३ मध्ये त्यात १७० रुपयांची वाढ करण्यात आली. त्यानंतर २०१३-१४ मध्ये त्यात ६० रुपये प्रतिक्विंटल भाववाढ करण्यात आली. मात्र त्या हंगामात २०० रुपये प्रतिक्विंटल बोनस मिळाल्यामुळे शेतकऱ्यांना काही प्रमाणात दिलासा मिळाला. आघाडी सरकारचे ते सत्तेतील शेवटचे वर्ष होते. शिवाय नजिकच्या छत्तीसगड आणि मध्यप्रदेश या भाजप सरकारांनी शेतकऱ्यांच्या धानाला बोनस जाहीर केल्यामुळे महाराष्ट्रातही आघाडी सरकारने शेतकऱ्यांना प्रतिक्विंटल २०० रुपये बोनस देऊन शेतकऱ्यांना बऱ्याच प्रमाणा दिसाला दिला होता. मात्र गेल्यावर्षी म्हणजे २०१४-१५ मध्ये सत्ताबदल झाला. भाजपचे सरकार केंद्रात सत्तेवर आले. हे सरकार सत्तारूढ झाल्यानंतरची धानाची पहिलीच भाववाढ त्यांनी अवघी ५० रुपये केली. त्यामुळे धानाला २०१४-१५ या हंगामात १३६० रुपये प्रतिक्विंटलचा दर मिळाला. मात्र शेवटी शेवटी का असेना शासनाच्या अधिकृत खरेदी केंद्रात धान विकणाऱ्या शेतकऱ्यांना प्रतिक्विंटल २५० रुपये सानुग्रह मदत देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला. त्यामुळे गेल्यावर्षीही शेतकऱ्यांना दिलासा मिळाला असे म्हणता येईल.

आता वर्ष २०१५-१६ करिता केंद्रीय कृषीमूल्य आयोगाने जाहीर केलेल्या धानाच्या हमीभावात पुन्हा एकदा केवळ ५० रुपये भाववाढ केली. त्यामुळे शेतकऱ्यांचा हिरमोड झाला आहे. जिल्ह्याचे खासदार नाना पटोले यांनीही याबाबत पंतप्रधानांची भेट घेणार असल्याचे सांगितले असले तरी धानाला अपेक्षित भाववाढ मिळवून देण्यात त्यांना यश येईल का, याबाबत शंका व्यक्त केली जात आहे.

दरम्यान या भाववाढीवरून राष्ट्रवादी काँग्रेसने भाजप सरकारला कोंडीत पकडत ही अल्प भाववाढ म्हणजे शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसण्याचा प्रकार असल्याचे म्हटले आहे. निवडणूक होताच याविरोधात आंदोलन सुरू करण्याचा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसने दिला.