भाजपात पंकजा एकाकी ? घोटाळयाचे आरोप फेटाळले

0
7

मुंबई, दि. १ – माझ्या खात्यात एक रुपयाचाही घोटाळा झालेला नसून मी केलेल्या खरेदीला ‘घोटाळा’ ठरवून खळबळ निर्माण करण्याचा प्रयत्न होत आहे असे पंकजा मुंडे यांनी म्हटले आहे. या प्रकरणात कोणत्याही प्रकारच्या चौकशीसाठी सामोरे जाण्यास तयार आहे व आरोप सिद्ध झाले तर स्वतःच मंत्रीपदाचा राजीनामा देईन असेही त्यांनी म्हटले आहे.मात्र गुरुवारी पंकजा मुंडे यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेला महिला व बालकल्याण खात्याचे अधिकारी, बहिण खासदार प्रीतम मुंडे आणि रासपचे महादेव जानकर उपस्थित होते. त्यामुळे पंकजा भाजपामध्ये एकाकी पडल्याची चर्चा आहे. मंगळवारी पहाटे लंडनहून परतल्यानंतर पंकजा मुंडे यांनी मुंबई विमानतळावर शक्तीप्रदर्शन घडवून आणले होते.

२०६ कोटी रुपयांच्या खरेदीप्रक्रियेतील घोटाळ्यामुळे पंकजा मुंडे अडचणीत आल्या आहेत. बुधवारी पंकजा मुंडे यांनी सह्याद्री अतिथीगृहावर पत्रकार परिषद घेतली. आमच्या खात्यात एक रुपयांचाही घोटाळा झाला नाही, केंद्र सरकारने महिला व बालकल्याण खात्याला दिलेले पैसे वाया जाऊ नये म्हणून आम्ही ही खरेदी केली असा पुनरुच्चार पंकजा मुंडे यांनी केला. आघाडी सरकारच्या काळातही महिला व बालकल्याण खात्यात साहित्य व पोषण आहारासाठी ४०८ कोटी रुपयांची खरेदी रेट काँट्रेक्टनेच झाली होती, मीदेखील याच पद्धतीचे अनुकरण केले, मग मी केलेल्या खरेदीला घोटाळा का म्हटले जाते असा सवालही त्यांनी उपस्थित केले. खरेदीऐवजी घोटाळा शब्द वापरुन विरोधक खळबळ माजवण्याचा प्रयत्न करत आहेत असा आरोपही त्यांनी केला आहे.

विनोद तावडेंची पाठराखण करण्यासाठी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार, सहकारमंत्री चंद्रकांत पाटील हे स्वतः पत्रकार परिषदेला उपस्थित होते. मात्र पंकजा मुंडे यांच्या पत्रकार परिषदेला एकही नेता उपस्थित नव्हता. पत्रकार परिषद संपत असताना प्रकाश मेहता हे पत्रकार परिषदेत आले. मुनगंटीवार व चंद्रकांत पाटील एका कार्यक्रमात व्यस्त असल्याने ते परिषदेला येऊ शकले नाही असे स्पष्टीकरण मुंडेनी दिले आहे. मात्र आता पंकजा मुंडे पक्षात एकाकी पडल्याची चर्चा चांगलीच रंगली आहे.