मुख्यमंत्र्यांचा अमेरिका दौरा: ‘क्रिसलर’ राज्यातील वाहन निर्मिती दुपटीने वाढविणार

0
16

मुंबई दि. १ : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अमेरिका दौऱ्यास अतिशय उत्साहवर्धक प्रतिसाद मिळत असून वाहन निर्मितीतील आघाडीच्या क्रिसलर समुहाने महाराष्ट्रातील आपले उत्पादन दुपटीने वाढविण्यात येईल असे जाहीर केले आहे. तसेच जनरल मोटर्स उद्योग समुहानेही महाराष्ट्रात वाढीव गुंतवणूक करण्यात रस दाखविला आहे.

डेट्रॉईट येथील जनरल मोटर्स आणि क्रिसलर या वाहन निर्मिती उद्योगातील आघाडीच्या समुहांच्या मुख्यालयास मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखालील राज्याच्या शिष्टमंडळाने भेट दिली. त्यावेळी अतिशय सकारात्मक वातावरणात चर्चा झाली. क्रिसलर उद्योग समुहाचे अध्यक्ष माईक मॅन्ले यांच्याशी मुख्यमंत्र्यांनी संवाद साधला. जीप हा प्रसिद्ध ब्रँड तयार करणारा क्रिसलर समूह महाराष्ट्रात फियाट क्रिसलर ऑटोमोबाईल्सच्या माध्यमातून यापूर्वीच कार्यरत आहे. समुहाच्या पुण्याजवळच्या रांजणगाव येथील प्रकल्पाची उत्पादन क्षमता दुप्पट करून 2018 पर्यंत 2 लाख 45 हजार वाहनांची निर्मिती केली जाईल, असे श्री. मॅन्ले यांनी या भेटीत सांगितले.

जनरल मोटर्सचे उपाध्यक्ष मॅट हॉब्ज आणि मुख्य अर्थतज्ज्ञ जी. मुस्तफा मोहतरेन यांच्याशीही मुख्यमंत्र्यांनी चर्चा केली. हा उद्योगसमूह राज्यात अधिक गुंतवणूक करण्यास उत्सुक आहे. नवीन वाहनांच्या आराखड्यांच्या निर्मितीच्या अनुषंगाने जनरल मोटर्स राज्यातील माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात गुंतवणूक करण्याबाबत विचार करीत आहे. तसेच नियमित वाहन निर्मितीशिवाय महामार्गावरील संपर्क यंत्रणेबाबतच्या तंत्रज्ञान निर्मितीत या समूहास रस आहे. त्यादृष्टीने या भेटीत अनुकूल चर्चा झाली.

डेट्रॉईट येथील महाराष्ट्र मंडळ आणि बृहन्महाराष्ट्र मंडळातर्फे आयोजित महाराष्ट्र व्यापार विकास परिषदेतही मुख्यमंत्र्यांनी मार्गदर्शन केले. यावेळी मुख्यमंत्री म्हणाले, उद्योगस्नेही वातावरण, तणावमुक्त परिस्थिती आणि कायदा-सुव्यवस्थेच्या उत्तम स्थितीमुळे राज्यात उद्योग-व्यापारासाठी अतिशय अनुकूल अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. महाराष्ट्र आणि मिशिगन प्रांत मानव संसाधन आणि तंत्रज्ञानविषयक सहकार्यासाठी एकत्र आल्यास आपण खूप काही करू शकतो, असा आशावाद व्यक्त करतानाच या प्रांताच्या परिपूर्ण विकासाबद्दल मुख्यमंत्र्यांनी मिशिगनचे गव्हर्नर रिचर्ड स्नायडर यांची प्रशंसा केली.

तत्पूर्वी न्यूयॉर्कमध्ये आयोजित ‘मुंबई मीट्स मॅनहॅटन’ या कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांचे अतिशय उत्साहात स्वागत करण्यात आले. जागतिक अर्थव्यवस्थेत आणि विकासाच्या प्रक्रियेत जगभरात विखुरलेल्या भारतीयांचे मोठे योगदान असल्याचे गौरवोद्‌गार काढून मुख्यमंत्री म्हणाले, आता देशाप्रती आपले कर्तव्य बजावण्याची वेळ आहे. आम्ही देशाची अर्थव्यवस्था सुदृढ करण्यासाठी कसोशीने प्रयत्न करीत आहोत. त्यात जगभरातल्या भारतीयांनी योगदान द्यावे. 2020 पर्यंत भारतीयांचे सरासरी वय 29 वर्षे इतके असणार आहे. या दरम्यान जपानमध्ये 48, चीनमध्ये 39, अमेरिकेत 37, पूर्व युरोपात 42 आणि पश्चिम युरोपात 44 इतके सरासरी वय असेल. महाराष्ट्रात सध्या निम्म्याहून अधिक लोकसंख्या ही 25 वर्षे वयोगटाखालील असल्याने त्यांना कौशल्यधारित शिक्षण देऊन राज्यात कुशल मनुष्यबळ मोठ्या प्रमाणात उपलब्ध होऊ शकते. या साऱ्यांच्या हातांना काम देण्याचे आव्हान आमच्यासमोर असून त्यासाठी महाराष्ट्राच्या औद्योगिक क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक अपेक्षित आहे.

या कार्यक्रमासाठी मोठ्या संख्येने मराठी मंडळींची उपस्थिती होती.