वसंतराव नाईक यांनी केलेल्या पायाभरणीमुळे महाराष्ट्र अजूनही अव्वल- राजकुमार बडोले

0
10

नागपूर दि. १ : : वसंतराव नाईकांनी आपल्या मुख्यमंत्रीपदाच्या प्रदीर्घ कारकिर्दीत कृषी, औद्योगिक, शिक्षण आदी क्षेत्रात भरीव कामगिरी केली. त्यांनी राज्याच्या विकासाची पायाभरणी केल्यामुळे आजही महाराष्ट्र देशाच्या अग्रस्थानी असल्याचे गौरवोद्गार राज्याचे सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांनी काढले.

स्व.वसंतराव नाईक यांच्या जयंती निमित्त नागपूर येथील विधानमंडळ सभागृहात आयोजित कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून श्री.बडोले बोलत होते. विधानमंडळाचे सचिव उत्तमसिंह चव्हाण, जिल्हाधिकारी सचिन कुर्वे यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती.

प्रारंभी स्व. नाईक यांच्या पुर्णाकृती पुतळ्यात पुष्पहार अर्पण करुन त्यांनी अभिवादन केले. त्यानंतर उपस्थित नागरिकांसमोर आपले विचार करताना राजकुमार बडोले म्हणाले, वसंतराव नाईक यांनी कृषी, सिंचन, ऊर्जा, शिक्षण, औद्योगिक आदी क्षेत्रात जाणीवपूर्वक लक्ष घातले. राज्याची अर्थव्यवस्था ही कृषीवर अवलंबून असते, या जाणीवेतून कापूस एकाधिकार, संशोधनाला वाव मिळावा म्हणून राज्यात चार कृषी विद्यापीठे, राज्य बियाणे महामंडळ आणि सिंचन प्रकल्प कार्यान्वित केले. विकासाच्या बाबतीत त्यांनी राज्यात खऱ्या अर्थाने पायाभरणी केली. त्यांच्या काळात राज्य विकासाकडे दमदारपणे वाटचाल करीत असताना 1972 मध्ये मोठा दुष्काळ पडला. कोयनेचा भूकंप झाला. अशा परिस्थितीतही ते डगमगले नाही. लोकांमध्ये विश्वास निर्माण केला आाणि नवनवे संकरित बियाणे राज्यात आणून कृषी उत्पादन वाढविले, परिणामी राज्य अन्नधान्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण झाले.

प्रास्ताविकात विधान मंडळाचे सचिव उत्तमसिंह चव्हाण यांनी स्व. वसंतराव नाईक यांच्या कार्य कर्तृत्वाची ओळख आपल्या भाषणातून करुन दिली. मुख्य समारंभापूर्वी वसंतराव नाईक यांच्या जीवनावर आधारित `कृषी व औद्योगिक क्रांतीचे प्रणेते` ही 20 मिनिटाची चित्रफित दाखविण्यात आली. यावेळी अधिकारी कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.