पत्रकारांवरील हल्ले रोखण्यासाठी कायदा करण्याबाबत सकारात्मक

0
9

मुंबई दि.१४- पत्रकारांवर होणारे हल्ले रोखण्यासाठी कायदा करण्याबाबत शासन सकारात्मक असून, याबाबत पत्रकारांशी चर्चा करून प्रयत्न केले जातील, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

मंत्रालयातील नवीन पत्रकार कक्षाचे उद्‌घाटन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झाले, त्याप्रसंगी ते बोलत होते. माहिती व जनसंपर्क महासंचालनालय तसेच मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघ यांनी संयुक्तरीत्या कार्यक्रमाचे आयोजन केले.

फडणवीस पुढे म्हणाले, पत्रकारांवर होणारे हल्ले रोखण्यासाठी कायदा करण्याबाबत शासन सकारात्मक विचार करीत आहे. चांगले काम करणाऱ्या पत्रकाराला संरक्षण मिळाले पाहिजे; परंतु पत्रकारितेच्या नावाखाली गैरप्रकार घडू नयेत, याचीही दक्षता घेतली पाहिजे. या दृष्टीने कायदा करण्याबाबत पत्रकारांशी चर्चा करण्यात येईल, अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी याप्रसंगी दिली. लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून पत्रकारितेचं स्थान महत्त्वाचे आहे. देशात इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रातील पत्रकारिता अधिक समृद्ध आहे. समृद्धतेची ही परंपरा कायम ठेवत सामान्य माणसाला न्याय मिळवून देण्यासाठी शासनासोबत पत्रकारांनीही आपली जबाबदारी पार पाडावी, असेही फडणवीस म्हणाले. पत्रकारांना निवृत्तिवेतन तसेच घरे देण्याबाबत शासन सकारात्मक असून, त्यादृष्टीने अधिक गतीने कार्यवाही केली जाईल, अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली.