लाच घेताना मुख्याध्यापिकेस अटक

0
12

चंद्रपूर,दि.१४-शाळेत पूनर्प्रवेश देण्यासाठी विद्यार्थिनीकडून २ हजार ५०० रुपयांची लाच स्वीकारणार्‍या दुर्गापूर येथील जनता विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सुरेखा चंद्रशेखर चिमुरकर (५७) यांना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून रंगेहात अटक केली. ही कारवाई सोमवार, १३ जुलै रोजी करण्यात आली.
दुर्गापूर येथील जनता विद्यालयात २०१४-१५ या शैक्षणिक सत्रात इयत्ता दहावीमध्ये शिक्षण घेत असलेली एक विद्यार्थिनी वडिलांच्या आजारपणामुळे शाळेत नियमित जाऊ शकली नाही. त्यामुळे तिचे नाव वर्गातून कमी करण्यात आले होते. काही दिवसानंतर ही विद्यार्थिनी शाळेत गेली असता तिला संबंधित वर्गशिक्षिकेने, तिचे नाव शाळेतून कमी करण्यात आले असून, तिला शाळेत यायचे असल्यास पुनर्प्रवेश घ्यावा लागेल, असे सांगितल्याने विद्यार्थिनीच्या आईने शाळेच्या मुख्याध्यापिका सुरेखा चिमुरकर यांची भेट घेतली. तेव्हा त्यांनी शाळेतील प्रवेश प्रक्रिया पूर्ण झाल्या असून, तुम्हाला प्रवेशासाठी ३ हजार रुपये द्यावे लागतील, असे सांगितले. विद्यार्थिनीची आई विधवा असून, मोलमजुरीचे काम करीत असल्याने लाचेची रक्म देणे तिला शक्य नव्हते. त्यामुळे त्यांनी लाचेची रकम कमी करण्याची मागणी चिमुरकर यांच्याकडे केली. त्यामुळे चिमूरकर यांनी ५०० रुपये कमी करून २ हजार ५०० रुपये देण्यास सांगितले. मात्र, तक्रारदारांची रक्कम देण्याची मुळीच इच्छा नसल्याने त्यांनी चंद्रपूर येथील लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे याबाबत तक्रार केली. तक्रारीवरून या विभागाच्या अधिकार्‍यांनी सापळा रचला.
दरम्यान, तक्रारदाराकडून २ हजार ५०० रुपये लाच स्वीकारताना सुरेखा चिमुरकर यांनी रंगेहात अटक करण्यात आली. त्यांच्याविरुद्ध लाचलुचपत प्रतिबंधक कायदा १९८८ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सुरू आहे. ही कारवाई पोलिस अधीक्षक राजीव जैन यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उप अधीक्षक रोशन यादव, पोलिस निरीक्षक व्ही. पी. आचेवार, पोलिस निरीक्षक अजय भुसारी, सुरेंद्र खनके, महेश मांढरे, मनोज पिदुरकर, अजय बागेसर, मपोशि समीक्षा भोंगळे, प्रकाश ईखारे यांनी केली