बँक कर्मचारी 7 जानेवारीला पुन्हा संपावर?

0
4

नवी दिल्ली – बँक कर्मचा-यांच्या वेतनवाढीविषयीचा तिढा अजूनही सुटू न शकल्याने बँक कर्मचारी नव्या वर्षात 7 जानेवारीला (बुधवार) संपावर जाण्याची शक्यता आहे. या एका दिवसाच्या संपामध्ये सार्वजनिक बँकांतील देशभरातील सुमारे 85 हजार शाखांमधील 10 लाखांहून अधिक कर्मचारी सहभागी होणार आहेत. युनायटेड फोरम ऑफ बॅंक युनियन्सने संपावर जाण्याचे आवाहन केले आहे.

बॅंक कर्मचाऱ्यांच्या मागण्या मान्य न झाल्यास संपाची मालिका सुरू करण्याचे कळते आहे. त्यामुळे बॅंक कर्मचारी पुन्हा 21 ते 24 जानेवारी 2015 असे चार दिवस संपावर जाण्याची शक्यता आहे. तरी देखील वेतनवाढीविषयीचा तिढा सुटला नाही, तर बॅंक कर्मचारी 16 मार्च 2015 पासून बेमुदत संपावर जातील.

याआधी बँकांनी सार्वजनिक बँक क्षेत्रातील कर्मचा-यांच्या वेतनवाढीच्या मुद्द्यावर राजधानीत कामगार आयुक्तांपुढे चर्चा केली होती. ‘युनायटेड फोरम ऑफ बँक युनियन्स‘ (यूएफबीयू) व ‘इंडियन बँक्स असोसिएशन‘ (आयबीए) यांच्यातील वाटाघाटीची ही 14वी फेरी होती. बँक व्यवस्थापनाची संघटना आयबीएने यापूर्वीच ठेवलेला 11 टक्के वेतनवाढीचा प्रस्ताव कायम ठेवला, तर वँक कर्मचारी संघटना आपल्या आधीच्या 25 टक्के वेतनवाढीच्या मागणीवरून यंदा 23 टक्क्य़ांवर आली. मात्र ही तडजोड यशस्वी न झाल्याने अखेर तिढा कायम राहिला.