वसमत : वसमत नगरपालिकेच्या मालकीच्या सर्वे नंबर १८० मधील भूखंडाच्या बनावट कागदपत्राच्या आधारे झालेल्या रजिस्ट्री प्रकरणामध्ये नगरपालिकेच्या वतीने तक्रार देण्यात आली असून, नगररचना विभागाच्या अधिकार्यांच्या बनावट स्वाक्षरी करून कागदपत्र रजिस्ट्री करण्यासाठी वापरल्याच्या प्रकरणात गुन्हा दाखल झाल्याने प्रचंड खळबळ उडाली आहे. आता नगरपालिकेच्या मालमत्तेला ‘चंदन’ लावण्याचे प्रकरण पेटले असून पोलीस निरीक्षक सुधीर वाघ यांनी चौकशीचा फास आवळणे सुरू केले आहे. यातून मोठी साखळी बाहेर येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
नगरपालिका अधिकार्यांच्या बनावट स्वाक्षर्या, बनावट शिक्के तयार करून नगरपालिकेच्या मालकीच्या सर्वे नंबर १८० मधील भूखंडाची मालकी रिविजन रजिस्टरला नोंदी घेऊन रजिस्ट्री झाल्या प्रकरणी नगराध्यक्ष व नगरसेवकांनी तक्रार केल्यानंतर मुख्याधिकार्यांनी या प्रकरणाच्या चौकशीसाठी व तक्रार देण्यासाठी नगरपालिकेतील तीन कर्मचार्यांना प्राधिकृत केले होते. मुख्याधिकार्यांनी प्राधिकृत केलेल्या कर्मचार्यांनी पोलिसात तक्रार दाखल केली. यामध्ये सर्वे नंबर १८० मधील भूखंडाची रजिस्ट्री करण्याच्या प्रकरणात नगररचना विभागाच्या कर्मचार्यांची बनावट स्वाक्षरी करून भूखंडाची रजिस्ट्री करण्यामध्ये कागदपत्र वापरण्यात आले असल्याची तक्रार देण्यात आली आहे.
प्राधिकृत केलेल्या पथकातील नगरपालिकेच्या कर्मचारी ज्ञानेश्वर मसाजी जाधव यांनी नगरपालिकेच्या वतीने पोलीस ठाण्यात रीतसर तक्रार दिली यामध्ये नगरपालिकेच्या नगररचना अधिकारी साक्षी भोसले यांची बनावट सही करून प्रमाणपत्र तयार करणे व इतर बनावट कागदपत्राद्वारे नगरपालिकेच्या जागेची रजिस्ट्री करणे यासह इतर मुद्द्यांवर तक्रार देण्यात आली आहे या तक्रारीवरून वसमत शहर पोलिसांनी देवानंद बाबाराव साबळे रा. कोर्टा, चोंडी बहिरोबा ता. वसमत ,आणि मंगेश नंदकिशोर पारवेकर वर्ष रा. ब्राम्हणगल्ली वसमत या दोघांच्या विरोधात विविध कलमान्वये गुन्हा नोंदवला आहे त्यामुळे प्रचंड खळबळ उडाली आहे. या प्रकरणाकडे सर्व वसमत शहराचे व राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे यातून काय निष्पन्न होते याची उत्सुकता शिगेला गेली आहे.
वसमतमध्ये खळबळ; पोलिसात तक्रार
वसमत मध्ये (Vasmat Municipal Council) नगरपालिकेचे भूखंड बनावट कागदपत्राच्या आधारे परस्पर विक्री करून कोट्यावधी रुपये हडप करण्याच्या प्रकरणात अनेक सूत्रधार आहेत त्यांनी आपल्या बगलबच्चांच्या ड्रायव्हर नोकरांच्या नावावर मालमत्ता करून चार-पाच मालक बदलून प्रकरण जुने आहे, असे भासवण्याचा प्लॅन केला होता व चंदनवाल्यांना जागा विकून नगरपालिकेलाच’चंदन’ लावण्याचा प्रकार केलेला आहे. मात्र पोलिसात तक्रार दिल्याने नामधारी मालक केलेले ड्रायव्हर हॉटेलमध्ये नोकर पोलिसांच्या रडारवर आले आहेत. पोलीस निरीक्षक वाघ यांच्यासमोर चौकशीत ते आता पोपटासारखे बोलतील त्यांनाच आपण मालक कसे झालो हे माहीत नाही. त्यावेळी खरे मालक व त्यांचे कारनामे जगासमोर येणार असल्याने वसमतमध्ये प्रचंड खळबळ उडाली आहे या संदर्भात पोलीस निरीक्षक सुधीर वाघ यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी बनावट स्वाक्षरी करून तयार करून प्रमाणपत्र तयार केल्याच्या प्रकरणात गुन्हा नोंद करण्यात आला आहे यानंतर सखोल चौकशी करून पुढील कारवाई करण्यात येणार असल्याचे सांगून कोणाचीही गय केली जाणार नाही. गुन्हेगारावर कारवाई होईल असे त्यांनी देशोन्नतीशी बोलताना सांगितले.
सुधीर वाघ यांचा अनेकांनी घेतला धसका
या प्रकरणाचा पोलीस निरीक्षक सुधीर वाघ सविस्तर अभ्यास करून कागदपत्राची पडताळणी केली आहे नगरपालिकेत जाऊन चौकशी केली आहे व आता तक्रार दिल्याप्रमाणे रिविजन रजिस्टरला प्रथम व्यक्तीची नोंद कशी आली सदर जागा पहिल्या व्यक्तीने कोणाकडून खरेदी केली याचीही चौकशी आता होणार आहे. त्यामुळे प्रचंड मोठा घोटाळा व मोठी साखळी उघड होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. कायदेशीर कारवाई करण्यामध्ये व गुन्ह्याचा छडा लावण्यामध्ये पोलीस निरीक्षक सुधीर वाघ यांचा हातखंडा आहे या प्रकरणाचा तपासही पोलीस निरीक्षक सुधीर वाघ यांच्याकडे आहे. त्यामुळे अनेकांनी धसका घेतला असल्याचे चित्र समोर येत आहे.





