गोंदिया-रेल्वे विभागाने गोंदिया-चंद्रपूर रेल्वे मार्गावरील भीमनगर येथील रेल्वे फाटक बंद करून अंडरपासचे(भुयारी मार्ग )बांधकाम सुरू केले आहे. या भुयारी मार्गाच्या बांधकामामुळे स्थानिक लोकांना गैरसोय होत असून त्यामुळे त्यांच्यात संतापाची लाट उसळली आहे. यामुळे भविष्यात जनतेला मोठी गैरसोय होईल व पावसाळ्यात चार ते पाच महिने वाहतूक विस्कळीत होईल आणि उर्वरित काळात रुग्णवाहिका, अग्निशमन वाहन , जेसीबी, शालेय बस आणि इतर वाहनांचे जाने येणे बंद होणार ज्या मुळे या विभागातील लोकांना मूलभूत सुविधांपासून वंचित राहावे लागेल. रेल्वे विभागाच्या या मनमानी बांधकामामुळे लक्ष्मीनगर, कुंभारे नगर, चंद्रशेखर वॉर्ड, श्रीनगर, आंबेडकर वॉर्ड आणि सावित्रीबाई फुले वॉर्ड येथील रहिवाशांना मोठी गैरसोय आणि त्रास होईल व त्यांचा उर्वरित शहराशी असलेला संपर्कही तुटेल. या समस्यांपासून दिलासा मिळावा म्हणून रेल्वे प्रशासनाने भुयारी मार्गाचे बांधकाम तात्काळ थांबवने आणि रेल्वे रुळावर उड्डाणपूल बनवून निर्माण होणाऱ्या समस्येवर तोडगा काढण्यासाठी उड्डाणपुलाचे बांधकाम सुरु करण्याची मागणी परिसरातील नागरिकांच्या २ हजारांहून अधिक सह्या असलेले एक निवेदन निवासी जिल्हाधिकारी श्री. बेहेरे यांना सादर केले. तसेच, यावर तोडगा न निघाल्यास, संतप्त नागरिकांनी “कामरोको रेलरोको आंदोलन” करण्याचा इशारा दिला आहे.या शिष्टमंडळात अमित कुमार भालेराव, जयंत कुंभलवार, कॉम्रेड मिलिंदकुमार गणवीर, भाऊराव गजभिये, सुनील चौहान, श्याम चौरे, सुरेश रंगारी, रोहित मेश्राम आदी कार्यकर्ते उपस्थित होते.





