परळीत जुनी पेन्शन हक्क संघटनेचा हल्लाबोल मोर्चा

0
8

बीड,दि,29- शासनाने महाराष्ट्र नागरी सेवा नियमाचा गाशा गुंडाळल्याने संतप्त कर्मचाऱ्यांनी आपल्या जुनी पेंशनच्या मागणीसाठी राज्यात सर्वत्र पालकमंत्र्यांच्या निवास आणि जिल्हाधिकारी कार्यालयावर हल्ला बोल आंदोलन गेल्या 27 जानेवारी आयोजित केले होते. या आंदोलनाचा एक भाग म्हणून बीड शाखेच्या वतीने पालकमंत्री पंकजा मुंडे यांच्या परळी येथील निवासस्थानासह तहसील कार्यालयावर हल्लाबोल आंदोलन करून आपल्या मागण्यांचे निवेदन सरकारला सादर केले.

राज्यात जुनी पेन्शन योजना लागू करावी, या मागणीसाठी राज्य जुनी पेन्शन हक्क संघटनेने अनेकदा कर्मचाऱ्यांसह धरणे, उपोषण, मोर्चे आंदोलने केली. वेळोवेळी मुख्यमंत्री, वित्तमंत्री यांनी संघटनेच्या शिष्टमंडळाला स्वतः पाचारण करून नागरी सेवा अधिनियम 1982 व 1984 अंतर्गत कुटुंब निवृत्ती वेतन योजनेचे तसेच सर्व कर्मचाऱ्यांना मृत्यू व सेवानिवृत्तीनंतर उपदानाचे लाभ देण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, अजूनही मंत्रिमहोदयांनी सदर लाभ देण्याच्या आश्वासनाची पूर्तता केली नाही. उलट जुनी पेन्शनच्या मागणीकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत आहेत. त्यामुळे कर्मचाऱ्यांमधील संतोष अधिक तीव्र होत आहे. हाच असंतोष आज परळीत शेकडो कर्मचाऱ्र्यांनी “जुनी पेंशन नाही तर मतदान नाही” घोषणा देत व्यक्त केला.
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी दिल्ली विधानसभेत जुनी पेन्शन चे विधेयक मंजूर करून दिल्लीतील सर्व शासकीय कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन लागू केली. तसेच कर्नाटक राज्याचे मुख्यमंत्री यांनी आपल्या घोषणापत्रातील आश्वासनानुसार सर्व कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना देण्याची घोषणा केली. देशातील इतर पाच राज्यांमध्ये कुटुंबनिवृत्ती वेतन योजनेचा तसेच सर्व कर्मचाऱ्यांना मृत्यू व सेवानिवृत्तीनंतर उपदानचे लाभ दिले आहेत. पण महाराष्ट्रात वेळकाढू धोरण मंत्रिमंडळाद्वारे अवलंबविल्या जात आहे. या विरोधात हे हल्लाबोल आंदोलन करून महाराष्ट्रातील 1 नोव्हेंबर 2005 नंतरच्या सर्व कर्मचाऱ्यांना महाराष्ट्र राज्य नागरी सेवा अधिनियम 1982 व 1984 ची जुनी पेन्शन योजना पूर्ववत लागू करा,अशी मागणी राज्य जुनी पेन्शन हक्क संघटनाद्वारे तहसीलदारांना दिलेल्या निवेदनातून मुख्यमंत्र्यांकडे करण्यात आली आहे. या मोर्चाला राज्यप्रवक्ते शिवाजी खुडे, राज्य कोषाध्यक्ष कैलास आरबाड, जिल्हाध्यक्ष विष्णू आडे, विशाल घोलप आण्णा घोडके, अमोल काळे, संदीप धोंडे, माणिक राठोड, जितेंद्र दहिफळे आदींनी संबोधित केले. संचलन मोहन गीते यांनी केले तर आभार परळी तालुकाध्यक्ष अशोक भोजने यांनी मानले.