25.1 C
Gondiā
Monday, August 3, 2026
Home मराठवाडा/खान्देश शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व पीजी इन्स्टिट्यूटबाबत पालकमंत्री छगन भुजबळ यांच्याकडून आढावा

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व पीजी इन्स्टिट्यूटबाबत पालकमंत्री छगन भुजबळ यांच्याकडून आढावा

0
1797

नाशिक, दि.१२ जून :- नाशिकमध्ये शासकीय पदव्युत्तर वैद्यकीय महाविद्यालय आणि शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्यात महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाने शासनाकडे प्रस्ताव पाठवला असून सदर प्रस्ताव मंजुरीच्या प्रतिक्षेत आहे. या दोन्ही महाविद्यालयांबाबत आज राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन विभागाचे विशेष कार्य अधिकारी डॉ. संदीप गुंडरे यांच्याकडून आढावा घेत सद्य:स्थिती जाणून घेतली. प्रस्तावाचा पाठपुरावा करून आवश्यक बाबींची तातडीने पूर्तता करण्यात यावी, अशा सूचना त्यांना दिल्या. यावेळी माजी खासदार समीर भुजबळ हेही उपस्थित होते.

नाशिकच्या सुपर स्पेशालिटी रुग्णालयात शासकीय पदव्युत्तर महाविद्यालय आणि शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्यासाठी राज्याचे अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा नाशिकचे पालकमंत्री छगन भुजबळ यांचे सतत प्रयत्न सुरू आहेत. यासाठी गेल्या काही दिवसांपूर्वीच मंत्रालयात वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख, सार्वजनिक आरोग्य मंत्री राजेश टोपे, आरोग्य विभागाचे प्रधान सचिव प्रदीप व्यास, वैद्यकीय शिक्षण विभागाचे सचिव डॉ. संजय मुखर्जी, वैद्यकीय शिक्षण संचालक डॉ. तात्याराव लहाने, महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापिठाचे कुलगुरु डॉ. दिलीप म्हैसेकर यांच्यासोबत बैठकही घेतली होती.

याबाबत शासनाकडे दाखल करण्यात आलेल्या प्रस्तावाचा सविस्तर तपशील इत्यादींबाबत छगन भुजबळ यांनी समन्वयक डॉ. संदीप गुंडरे यांच्याकडून आज सादरीकरणाद्वारे माहिती जाणून घेतली व आवश्यक त्या बाबींची पूर्तता करून तातडीने पाठपुरावा करण्याच्या सूचना दिल्या. वैद्यकीय शिक्षण संचालक डॉ.तात्याराव लहाने यांनी नाशिकच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासाठी समन्वयक म्हणून डॉ. संदीप गुंडरे यांची नेमणूक केली आहे.