गोंदिया दि.12 (जिमाका) जिल्ह्यात आज एक नवा कोरोना बाधित रुग्ण 10 दिवसांनी आढळला.गोंदियाच्या प्रयोगशाळेतील तपासणी केंद्रातून आज 12 जून रोजी प्राप्त चाचणी अहवालावरून हा रुग्ण कोरोना बाधित असल्याचे स्पष्ट झाले.हा रुग्ण 20 ते 30 वर्ष वयोगटातील असून तो तिरोडा तालुक्यातील आहे.
जिल्ह्यात आतापर्यंत जे कोरोना बाधित रुग्ण आढळले ते 26 मार्चला एक रुग्ण,19 मे रोजी दोन रुग्ण, 21 मे रोजी सत्तावीस रुग्ण , 22 मे रोजी दहा रुग्ण, 24 मे रोजी चार रुग्ण, 25 मे रोजी चार रुग्ण, 26 मे रोजी एक रुग्ण, 27 मे रोजी एक रुग्ण, 28 मे रोजी 9 रुग्ण, 29 मे तीन रुग्ण,30 मे रोजी चार रुग्ण,31 मे रोजी एक रुग्ण,2 जून रोजी दोन आणि आज 12 जून रोजी एक रुग्ण असे एकूण 70 रुग्ण कोरोना बाधित आढळून आले .
2 जून ते 11 जून या नऊ दिवसाच्या कालावधीत नवीन कोरोना बाधित रुग्ण आढळून आलेला नव्हता.आज दहाव्या दिवशी एक रुग्ण आढळून आल्यामुळे कोरोनामुक्त असलेल्या गोंदिया जिल्हयात पुन्हा कोरोना बाधित व्यक्तीची भर पडली आहे.
जिल्ह्यातील 1190 व्यक्तींच्या घशातील स्त्रावाचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले असता त्यामध्ये 70 रुग्ण कोरोना बाधित आढळले. अद्याप 29 नमुन्यांचा चाचणी अहवाल गोंदियाच्या प्रयोगशाळेच्या तपासणी केंद्रात प्रलंबित आहे.
जिल्ह्यातील सर्व 69 रुग्ण कोरोनामुक्त झाले.आज एक नवीन कोरोना बाधित रुग्ण मिळाल्याने जिल्ह्यात आतापर्यंत एकूण 70 कोरोना बाधित व्यक्ती आढळून आल्या आहे.जिल्ह्यात आता एक क्रियाशील कोरोना बाधित रुग्ण आहे.
जिल्ह्यातील विविध शाळा व संस्थांमध्ये 1360 आणि घरी 1599 असे एकूण 2959 व्यक्ती अलगीकरणात असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ श्याम निमगडे यांनी दिली.





