‘राष्ट्रीय संस्कृती महोत्सवा’मध्ये ‘एक भारत श्रेष्ठ भारत’चा नारा अधिक मजबूत होईल- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

0
7

मुंबईदि. 12: प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी ‘एक भारत श्रेष्ठ भारत’ चा नारा दिलेला आहे. राष्ट्रीय संस्कृती महोत्सवामध्ये हा नारा अधिक मजबूत होईल. कारण कला हीच अशी गोष्ट आहे की सर्व लोकांना एकत्र जोडत असते. आपण नव्या पिढीपर्यंत या महोत्सवाच्या माध्यमातून कला पोहोचवण्याचे काम करू, असे मत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केले.

            आझाद मैदान येथे राष्ट्रीय संस्कृती महोत्सव – 2023’ भारतीय सांस्कृतिक वारसा महोत्सव हा केंद्र शासनाच्या सांस्कृतिक विभागातर्फे आयोजित केला आहे. हा महोत्सव दि. 11 ते 19 फेब्रुवारी या कालावधीत होणार आहे. या कार्यक्रमाच्या उद्घाटनानंतर मुख्यमंत्री श्री.शिंदे बोलत होते. यावेळी केंद्रीय सांस्कृतिक आणि पर्यटन मंत्री जी. किशन रेड्डीसांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार, पर्यटन मंत्री मंगल प्रभात लोढा, सांस्कृतिक कार्य विभागाचे प्रधान सचिव विकास खारगे, केंद्रीय सांस्कृतिक विभागाच्या सह सचिव अमिता प्रसाद साराभाई यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.

             मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले, आजपासून सुरू झालेला ‘राष्ट्रीय सांस्कृतिक महोत्सव’ महाराष्ट्रात आयोजित केल्याबद्दल मी सर्वप्रथम केंद्रीय सांस्कृतिक आणि पर्यटन मंत्री जी. किशन रेड्डीजी यांना धन्यवाद देतो. आजपासून सुरु होणाऱ्या या महोत्सवाच्या निमित्ताने सगळ्या देशातील कला इथे सादर होणार आहेत. खरंतर आझाद मैदान येथे अनेक वेळा राजकीय कार्यक्रम होतात, रॅली येतात किंवा खेळाच्या स्पर्धा होतात, मात्र आझाद मैदानावर प्रथमच अशा प्रकारे सांस्कृतिक कार्यक्रम होत आहे, असेही मुख्यमंत्री श्री.शिंदे म्हणाले.

            मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले, देशात स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करत असताना एक लाखापेक्षा जास्त कार्यक्रम देश – विदेशात घेतले आहेत. हा केवळ शासनाचा कार्यक्रम नसून तो जनतेचा कार्यक्रम आहे. महाराष्ट्र शासनाने संस्कृती आणि कलेला नेहमी प्रोत्साहन दिलेले आहे. नुकतेच महारार्ष्ट शासनाने ‘जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा’ या गीताला राज्य गीत म्हणून स्वीकारले आहे. पर्यटन वाढीसाठी चालना देणारे उपक्रम राज्यात सुरू आहेत. राज्यात अनेक विकास प्रकल्पांचे लोकार्पण नुकतेच प्रधानमंत्री यांच्या हस्ते करण्यात आले. विकासाची घौडदौड अशीच सुरु राहणार आहे, असेही मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी सांगितले.

            मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले की, आजच्या धकाधकीच्या जीवनात अशा प्रकारच्या कार्यक्रमामुळे वातावरण देखील हलकेफुलके होते. महाराष्ट्रात असा कार्यक्रम होत आहे याचा मला खूप आनंद आहे. भारत देश हा विविध संस्कृतीने समृद्ध असलेला देश आहे. या कार्यक्रमांच्या माध्यमातून आपल्या देशातील कला नव्या पिढीला समजतील. या कार्यक्रमासाठी लागणारे सर्व सहकार्य केंद्र शासनाला केले जाईल असेही मुख्यमंत्री श्री. शिंदे यावेळी म्हणाले.