संसदेचे कामकाज सोमवारपर्यंत स्थगित:काँग्रेस खासदार म्हणाले – राहुल गांधींना बोलू द्या

0
14

नवी दिल्ली- संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या दुसऱ्या टप्प्यातील 5 व्या दिवसाचे कामकाज अवघ्या 20 मिनिटांत गुंडाळण्यात आले. सभागृहातील नारेबाजीमुळे अध्यक्ष ओम बिर्ला यांनी लोकसभेचे कामकाज सोमवारपर्यंत तहकूब केले. तत्पूर्वी, काँग्रेस खासदारांनी राहुल गांधी यांना बोलू देण्याच्या समर्थनार्थ नारेबाजी केली. तर सत्ताधारी भाजपचे सदस्य मागील 4 दिवसांपासून राहुल गांधी यांच्या केंब्रिजमधील भाषणाप्रकरणी माफीची मागणी करत आहेत. राज्यसभेचे कामकाजही सोमवारी सकाळी 11 वाजेपर्यंत स्थगित करण्यात आले आहे.

दुसरीकडे, सभागृह तहकूब झाल्यानंतर काँग्रेस खासदारांसह 16 विरोधी पक्षांनी काँग्रेस नेत्या सोनिया गांधी, राहुल गांधी व अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्यासोबत संसद परिसरातील महात्मा गांधींच्या पुतळ्याजवळ अदानी प्रकरणी सरकारविरोधात निदर्शने केली.

अपडेट्स…

  • काँग्रेस नेते के सी वेणुगोपाल यांनी राज्यसभेत सोनिया व राहुल गांधी यांच्याविरोधात अवमानकारक टिप्पणी केल्याप्रकरणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात विशेषाधिकार उल्लंघनाचा प्रस्ताव दाखल केला.
  • खासदार शशी थरुर म्हणाले – “भारतीय लोकशाही वाचवण्यासाठी परकीय शक्तींनी आमच्या देशात यावे असे राहुल गांधी केव्हाच म्हणाले नाही. ही निराधार गोष्ट आहे. यासाठी माफी मागण्याची काहीच गरज नाही. संसद चालवण्याची जबाबदारी सरकारची आहे.

राहुल गांधींनी मागितला संसदेत बोलण्यासाठी वेळ

राहुल गांधी शुक्रवारी सलग दुसऱ्या दिवशी लोकसभेच्या कामकाजात सहभागी होण्यासाठी पोहोचले होते.
राहुल गांधी शुक्रवारी सलग दुसऱ्या दिवशी लोकसभेच्या कामकाजात सहभागी होण्यासाठी पोहोचले होते.

राहुल गांधी गुरुवारी संसदेत आले होते. त्यांनी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांची भेट घेऊन सभागृहात बोलण्यासाठी वेळ देण्याची मागणी केली होती.

दुसरीकडे, भाजपने त्यांच्या माफीची मागणी केली आहे. भाजपच्या निशिकांत दुबे यांनी लोकसभा अध्यक्षांना पत्र लिहून राहुल गांधी यांची सभागृहातून हकालपट्टी करण्याची मागणी केली आहे. तसेच त्यांच्या विधानाची चौकशी करण्यासाठी एक विशेष समिती स्थापन करण्याचीही मागणी केली आहे. संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या दुसऱ्या टप्प्याचा आजचा 5 वा दिवस आहे. यापूर्वीच्या 4 दिवसांत राहुल गांधींचे लंडन स्थित केंब्रिज विद्यापीठातील भाषण व अदानी प्रकरणी तीव्र गदारोळ झाला होता.

भाजपची विशेष समिती स्थापन करण्याची मागणी

खासदार निशिकांत दुबे यांनी राहुल गांधींच्या विधानाची चौकशी करण्यासाठी एक विशेष समिती स्थापन करण्याची मागणी केली आहे. दुबे म्हणाले की, राहुल गांधी यांनी युरोप व अमेरिकेतील आपल्या विधानांमुळे सातत्याने संसद व देशाची प्रतिमा मलिन केली आहे. त्यामुळे त्यांना संसदेतून निलंबित करण्याची वेळ आली आहे. त्यांचे लोकसभा सदस्यत्व समाप्त करण्यात मदत केली जावी.

दुसरीकडे, भाजप अध्यक्ष जे पी नड्डा यांनी एक व्हिडिओ जारी करत राहुल गांधी यांच्या माफीची मागणी केली आहे. ते म्हणाले – दुर्दैवाने काँग्रेस देशविरोधी कृतीत सहभागी झाली आहे. जनतेने वारंवार झिडकारल्यानंतरही राहुल गांधी देशविरोधी टूलकिटचे स्थायी सदस्य बनलेत.

राहुल गांधी म्हणाले – अदानी मुद्यावर मोदी घाबरले, ते माझी संसदेत मुस्कटदाबी करणार

राहुल गांधी यांनी गुरुवारी आयोजित पत्रकार परिषदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना त्यांच्या अदानींसोबतच्या संबंधांची विचारणा केली होती.
राहुल गांधी यांनी गुरुवारी आयोजित पत्रकार परिषदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना त्यांच्या अदानींसोबतच्या संबंधांची विचारणा केली होती.

राहुल गांधी यांनी गुरुवारी लंडनमध्ये केलेल्या भाषणावर स्पष्टीकरण दिले. ते म्हणाले की, सार्वजनिक रेकॉर्डमधून काढून टाकण्यासारखी कोणतीही गोष्ट माझ्या भाषणात नव्हती. सर्व माहिती गोळा व्यवस्थित गोळा करण्यात आली होती. हा संपूर्ण मुद्दा जनतेचे लक्ष विचलित करण्यासाठी आहे. प्रत्यक्षात पंतप्रधान मोदी हे अदानी प्रकरणाला घाबरले आहेत. त्यांचा अदानींशी काय संबंध आहे हे त्यांनी सांगावे.

लंडनमध्ये दिलेल्या भाषणावर मी संसदेत विस्तृत उत्तर देणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. ते म्हणाले – मी खासदार आहे. संसद हे माझे व्यासपीठ आहे. अदानी श्रीलंका, बांगलादेश व ऑस्ट्रेलियामध्ये कंत्राट मिळवत आहेत. पंतप्रधान व ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान यांच्यात काय बोलणे झाले, याचेही उत्तर पंतप्रधानांना देता आले नाही.

मी लोकसभेचा सदस्य आहे. माझा मुद्दा संसदेत मांडणे ही माझी जबाबदारी आहे. उद्या मला संसदेत बोलण्याची संधी मिळाली तर मी तिथे या विषयावर माझे मत सविस्तरपणे मांडेन. मात्र, ते मला संसद भवनात बोलू देणार नाहीत, असे दिसते, असेही राहुल गांधी यावेळी म्हणाले.

काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या निवासस्थानी गुरुवारी विरोधी पक्षनेत्यांची बैठक झाली.
काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या निवासस्थानी गुरुवारी विरोधी पक्षनेत्यांची बैठक झाली.