रविवारपासून “सर्च”मध्ये आदिवासी आरोग्यावर राष्ट्रीय कार्यशाळा

0
16

गडचिरोली, दि. १0: वैद्यकीय सुविधांच्या अभावामुळे भारतातील १० कोटी आदिवासींचे आरोग्य धोक्यात आले आहे. त्यांचे आरोग्य सुधारण्याच्या दृष्टीने विचारमंथन व उपाययोजना करण्यासाठी ११ ते १३ ऑक्टोबर या कालावधीत चातगाव येथील “सर्च” संस्थेत तीन दिवसीय राष्ट्रीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे.
“आदिवासी आरोग्यासाठी उत्तम उपाय” हा या कार्यशाळेचा विषय असून, केंद्र सरकारच्या आरोग्य मंत्रालयाने ही कार्यशाळा आयोजित केली आहे. केंद्रीय आरोग्य संशोधन विभागाच्या सचिव व भारतीय आयर्विज्ञान परिषदेच्या महासंचालक डॉ.सौम्या स्वामीनाथन यांच्या हस्ते या कार्यशाळेचे उद्घाटन होणार आहे. आदिवासींच्या वर्तमान आरोग्यस्थितीचा व आरोग्य सेवांचा राष्ट्रीय पातळीवर आढावा घेऊन स्थिती सुधारण्यासाठी नवा आरोग्य आराखडा बनविण्यास्तव भारत सरकारने राष्ट्रीय पातळीवर तज्ज्ञ समिती स्थापन केली असून, डॉ.अभय बंग या समितीचे अध्यक्ष आहेत. या समितीद्वारा मागील दोन वर्षांपासून या विषयांचा अभ्यास सुरु आहे. देशातील आदिवासी लोकसंख्येचे जन्म,मृत्यू दर, बालमृत्यूदर, कुपोषण, प्रमुख रोग व त्यांचे प्रमाण, आरोग्य सेवा व त्यांची स्थिती अशा विविध विषयांची शास्त्रीय आकडेवारी राष्ट्रीय पातळीवर प्रथमच गोळा करण्यात आली आहे. समिती सदस्यांनी विविध राज्यांना भेटी देऊन तेथील आदिवासी आरोग्याची स्थिती व अडचणींचे अवलोकन केले. तसेच आदिवासी प्रतिनिधी, शासकीय अधिकारी व स्वयंसेवी संस्थांची मते जाणून घेतली आहेत. आता पुढील उपाययोजनांसाठी सर्चमध्ये ही कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे. या कार्यशाळेत आदिवासी क्षेत्रात काम करणाऱ्या देशभरातील संशोधन संस्था, विविध राज्य सरकार व स्वयंसेवी संस्थांनी यशस्वी केलेले प्रकल्प, वेगवेगळया ठिकाणी आदिवासी आरोग्यासाठी होत असलेल्या उपाययोजना यामधून उत्तम प्रकारचे प्रयोग निवडून त्यांना आरोग्य मंत्रालयाद्वारे या कार्यशाळेला आमंत्रित करण्यात आले आहे. महाराष्ट्र, मध्यप्रदेश, गुजरात, छत्तीसगड,झारखंड, ओरिसा, आंध्रप्रदेश, तेलंगाणा, आसाम, उत्तर-पूर्व राज्य, केरळ, अशा विविध राज्यांतून तसेच भारतीय आयुर्विज्ञान संस्थेचे शास्त्रज्ञ या कार्यशाळेत सहभागी होणार आहेत. २५ प्रयोगांची या कार्यशाळेत मांडणी केली जाणार असून, त्यांच्या पद्धती व परिणाम तपासून, उपयुक्त शिफारशी निवडण्यात येणार आहेत.