१ जानेवारीपासून मुलाखत न देता मिळेल सरकारी नोकरी!

0
7

नवी दिल्ली, दि. २५ – सरकारी नोकरीतील छोट्या पदांसाठी १ जानेवारी २०१६ पासून मुलाखती घेण्यात येणार नाहीत, अशी घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ‘मन की बात’ कार्यक्रमादरम्यान केली. येत्या जानेवारी महिन्यापासून बी, सी व डी श्रेणीतील केंद्र सरकारच्या नोक-यांसाठी मुलाखती अट रद्द करण्यात आल्याची महत्वपूर्ण घोषणा त्यांनी केली. एक किंवा दोन मिनिटांच्या मुलाखतीत समोरील व्यक्तीची संपूर्णपणे पारख केल्याचे माझ्या ऐकीवात तरी आले नाही, त्यामुळे छोट्या-छोट्या नोक-यांसाठी मुलाखतीचा फार्स नको, असे ते म्हणाले. मात्र कोणाच्याही शिफारसीवरून या नोक-या देण्यात येणार नसल्याचेही मोदींनी स्पष्ट केले.
आज सकाळी ‘मन की बात’ कार्यक्रमाद्वारे पंतप्रधान मोदींनी देशातील जनतेशी १३ व्यांदा संवाद साधला. भाषणाच्या सुरूवातीसच त्यांनी टीम इंडिया व दक्षिण आफ्रिकेला आजच्या पाचव्या व निर्णायक सामन्यासाठी शुभेच्छा दिल्या. जनतेशी संवाद साधताना आज पंतप्रधानांनी अवयव दानाचे महत्व विशद केले. केरळमधील शाळेतील मुलींनी पत्र लिहून अवयवदान मोहिमेबद्दल पंतप्रधानांना माहिती दिली होती. त्या मोहिमेला आजच्या भाषणातून प्रोत्साहन देत मोदींनी देशातील जनतेला मरणोत्तर अवयव दान करण्याचे आवाहन केले.