दिलीप कुमार पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित

0
10

मुंबई, दि. १३ – आपल्या अभिनयाने एककाळ हिंदी चित्रपटसृष्टी गाजवणारे प्रसिध्द अभिनेते दिलीप कुमार यांना रविवारी पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी दिलीप कुमार यांच्या बांद्रयातील निवासस्थानी जाऊन त्यांना हा पुरस्कार प्रदान केला. पदक, शाल आणि प्रमाणपत्र देऊन राजनाथ सिंह यांनी ९३ वर्षीय  दिलीप कुमार यांना सन्मानित केले.

यावेळी त्यांच्या पत्नी सायरा बानू तिथे उपस्थित होत्या. हा पुरस्कार प्रदान करताना महाराष्ट्राचे राज्यपाल सी.विद्यासागर राव, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तिथे उपस्थित होते. प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला २५ जानेवारी २०१५ रोजी केंद्र सरकारने पद्मविभूषण या प्रतिष्ठेच्या पुरस्कारासाठी दिलीप कुमार यांच्या नावाची घोषणा केली होती.
वयोमान आणि प्रकृती अस्वास्थामुळे दिलीप कुमार एप्रिल महिन्यात राष्ट्रपती भवनात झालेल्या या कार्यक्रमाला उपस्थित राहू शकले नव्हते. दिलीप कुमार यांनी चित्रपटसृष्टीला भरपूर योगदान दिले आहे. तेच लक्षात घेऊन त्यांना या पुरस्काराने सन्मानित केल्याचे राजनाथ सिंह यांनी सांगितले.