७५ अाेलांडलेल्या मंत्र्यांना केंद्रातून डच्चू मिळणार?

0
5

नवी दिल्ली- वयाची पंचाहत्तरी ओलांडल्याचे कारण देत भाजपने मध्य प्रदेश सरकारमधून दोन मंत्र्यांना वगळण्याचा निर्णय घेतल्यामुळे केंद्रात लवकरच होणाऱ्या मंत्रिमंडळ विस्तारातही केंद्रीय मंत्र्यांनाही तो निकष लावला जाण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.

भाजप अध्यक्ष अमित शहा यांनी बुधवारी सायंकाळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत प्रदीर्घ बैठक घेतली. उभय नेत्यांमध्ये मंत्रिमंडळ विस्तार आणि संघटनात्मक फेरबदलावर चर्चा झाल्याचे सांगण्यात येते. याच बैठकीत वयाची पंचाहत्तरी ओलांडलेल्या केंद्रीय मंत्र्यांना संघटना बांधणीच्या कामासाठी पाठवण्याबाबत विचारविनिमय झाल्याचे सूत्रांनी सांगितले.

केंद्रीय अल्पसंख्याक मंत्री नजमा हेपतुल्ला यांनी गेल्या वर्षीच्या एप्रिल महिन्यातच वयाची ७५ वर्षे पूर्ण केली आहेत. त्यांचे सहकारी कलराज मिश्रा शुक्रवारी पंचाहत्तरी ओलांडत आहेत. भाजपने मंत्रिपदासाठी वयाचा अधिकृत निकष ठरवला नसला तरी केवळ वय झाल्यामुळेच ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी आणि मुरलीमनोहर जोशी यांना केंद्रीय मंत्रिमंडळाबाहेर ठेवण्यात आले आणि त्यांना ‘मार्गदर्शक मंडळा’त घेण्यात आले, अशी व्यापक समजूत आहे. पुढच्या वर्षी उत्तर प्रदेश विधानसभेच्या निवडणुका असल्यामुळे त्या राज्यातील जुना जाणता ब्राह्मण चेहरा म्हणून ओळख असलेल्या कलराज मिश्रांना मात्र मंत्रिमंडळात कायम ठेवले जाऊ शकते, असे भाजपच्या काही नेत्यांना वाटते. उत्तर प्रदेश आणि आसामसारख्या राज्यांना विस्तारात प्रतिनिधित्व मिळू शकते.