मोदींच्या मंत्रिमंडळात 19 नवे चेहरे, महाराष्ट्रातून भामरे आणि आठवलेंची वर्णी

0
5

नवी दिल्ली, दि. 05 – पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मंत्रिमंडळाचा बहुचर्चित विस्तार करण्‍यात आला आहे. 10 राज्यातील 19 नव्या चेहऱ्यांना मंत्रिमंडळात संधी देण्यात आली आहे. राष्ट्रपती भवनात राष्ट्रपती प्रणव मुखर्जीयांनी 19 मंत्र्यांना पद आणि गोपनियतेची शपथ दिली. या सोहळ्याला उपराष्ट्रपती हमीद अन्सारी, नरेंद्र मोदी, अरुण जेटली, भाजपाध्यक्ष अमित शाह व आदी उपस्थित होती.

या मंत्रिमंडळ विस्तारात पाच एसटी, दोन अल्पसंख्यांक आणि दोन महिलांचा समावेश आहे. प्रकाश जावडेकरांना प्रमोशन म‍िळाले असून त्यांनी कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतली. जावडेकरांकडे पर्यावरण राज्यमंत्रिपदाची जबाबदारी होती.

महाराष्ट्रातून धुळ्याचे खासदार डॉ सुभाष भामरे आणि रिपाईचे अध्यक्ष रामदास आठवले यांना मंत्रिमंडळात स्थान देण्यात आलं आहे. रामदास आठवले शपथ घेताना नाव विसरल्याने त्यांना पुन्हा शपथ घ्यावी लागली. मोदींच्या मंत्रिमंडळात प्रकाश जावडेकर यांना प्रमोशन मिळालं आहे. जावडेकर यांची राज्यमंत्रिपदावरुन कॅबिनेटपदी वर्णी लागली आहे.

शपथ घेतलेले मंत्री –
1) प्रकाश जावडेकर
2) एस एस अहलुवालिया
3) फग्गन सिंग कुलस्ते
4) रमेश चंडाप्पा
5) विजय गोयल
6) अनिल दवे
7) पुरुषोत्तम रुपाला
8) एम जे अकबर
9) अर्जून राम मेघवाल
10) जसवंत सिंह भाभोर
11) डॉ. महेंद्रनाथ पांडे
12) अजय टाम्टा
13) कृष्णा राज
14) मन्सूख एल मंडाविया
15) अनुप्रिया सिंह पटेल
16) सी आर चौधरी
17) पी पी चौधरी
18) डॉ. सुभाष भामरे
19) रामदास आठवले

या विस्तारात महाराष्ट्रातून रिपाइं नेते रामदास आठवले आणि धुळ्याचे भाजप खासदार डॉ. सुभाष भामरे यांना संधी मिळाली आहे. विनय सहस्रबुद्धे यांच्याही नावाची चर्चा होती. मात्र महाराष्ट्रातून चेहरे निवडताना भाजपने पुन्हा आपला जुना मित्रपक्ष शिवसेनेचा नेम साधला आहे. आधी शिवसेनेशी जवळीक असलेले आठवले आणि शिवसेनेतूनच भाजपमध्ये आलेले डॉ. भामरे यांना भाजपमधील ज्येष्ठ खासदार डावलून संधी देण्यात आली आहे. तर केंद्र- राज्यात सत्तेत भागीदार असूनही शिवसेनेला या विस्तारापासून लांबच ठेवले आहे.

शिवसेनाप्रमुखांच्या हयातीत ‘शिवशक्ती- भीमशक्ती’च्या एकत्रीकरणाची शिवसेनेसोबत मोट बांधणारे रिपाइं नेते रामदास आठवले यांना शिवसेनेकडून फारसे महत्त्व मिळत नसल्याचे लक्षात घेऊन भाजपने आधी आपल्या कोट्यातून खासदारकी दिली. त्यामुळे आठवले शिवसेनेपासून दुरावले आणि भाजपच्या जवळ आले. त्याच आठवलेंच्या गळ्यात आता मंत्रिपदाचीही माळ घालण्यात येत आहे. धुळ्याचे खासदार डॉ. सुभाष भामरे यांना माजी मंत्री एकनाथ खडसेंनी शिवसेनेतून भाजपमध्ये आणले आणि उमेदवारीही दिली. त्यांच्यामुळे शिवसेना-भाजप युतीमध्ये चांगलेच बिनसलेही होते. त्याच डॉ. भामरेंना रावसाहेब दानवे भाजपचे प्रदेशाध्यक्ष झाल्यामुळे रिक्त झालेली मंत्रिपदाची जागा भरताना भाजपने संधी दिली आहे.