राष्ट्रपती व उपराष्ट्रपती राजकीय व्यक्ती असाव्या

0
10

नवी दिल्ली : राष्ट्रपती व उपराष्ट्रपतीपदी अन्य क्षेत्रातील व्यक्ती नव्हे तर केवळ राजकीय व्यक्ती असाव्यात, असे मत राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी व्यक्त केले आहे़

लोकसभा आणि विधानसभेच्या पीठासीन अधिकाऱ्यांबाबतही याच अंगाने विचार व्हायला हवा़ कारण अराजकीय व्यक्ती या पदांसाठी प्रतिष्ठित व पात्र असूनही या पदासोबत येणारी नाजूक स्थिती सांभाळण्याचे कसब आणि अपेक्षित राजकीय पारख त्यांच्याकडे असेलच असे नाही, असे मत राष्ट्रपतींनी आपल्या ‘द ड्रामेटिक डेकेड: द इंदिरा गांधी इयर्स’ या पुस्तकात मांडले आहे़

भारतात सामान्यत: पीठासीन अधिकारी वा निवडलेले अधिकारी हे राजकीय पक्षाच्या पाठिंब्यानेच निवडून येतात़ त्यामुळे ते राजकीय प्रभावातून मुक्त असण्याची अपेक्षा करता येणार नाही़ अशा लोकांनी तटस्थ राहायला हवे; परंतु ही तटस्थता उपहासात्मक स्तरापर्यंत जाऊ नये, असे मत राष्ट्रपतींनी व्यक्त केले आहे़

आतापर्यंत एस़ राधाकृष्णन आणि एपीजे अब्दुल कलाम यांनी कुठल्याही राजकीय पार्श्वभूमीशिवाय देशाचे सर्वोच्च पद भूषविले आहे़ याचप्रमाणे एस़ राधाकृष्णन, जी़एस़ पाठक आणि न्या़ एम हिदायतुल्ला यांनीही कुठल्याही राजकीय पार्श्वभूमीशिवाय उपराष्ट्रपतिपदाचा कार्यकाळ पूर्ण केला आहे़