थायलंड भारतात साजरा करणार ‘नमस्ते थायलंड’ महोत्सव

0
8

मुंबई, दि. 8 : थायलंडचे सांस्कृतिक मंत्री वीरा राजपोजचनाराट यांनी आज राज्यपाल चेन्नमनेनी विद्यासागर राव यांची राजभवन येथे सदिच्छा भेट घेतली.भारत आणि थायलंड या देशांमध्ये राजनैतिक संबंध प्रस्थापित होण्याला 70 वर्षे पूर्ण होत असून या निमित्त थायलंड भारतात ‘नमस्ते थायलंड’ हा थायलंडच्या संस्कृतीचे दर्शन घडविणारा महोत्सव आयोजित करीत असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली.
तसेच येत्या ऑगस्ट महिन्यात भारत देखील थायलंडमध्ये ‘सवास्दी इंडिया’ हा भारताच्या संस्कृतीचे दर्शन घडविणारा महोत्सव आयोजित करणार असल्याचे त्यांनी सांगितले.थायलंडवर भारतीय संस्कृतीचा मोठा प्रभाव आहे. उभय देशातील लोकांची संस्कृती आणि धार्मिक श्रद्धा समान आहेत असे सांगतांना थायलंडमध्ये ‘गणेश’ हे सर्वात लोकप्रिय दैवत असल्याचे त्यांनी सांगितले. मुंबई म्हटले की आमच्या लोकांना दोन गोष्टी – सिद्धिविनायक मंदिर आणि बॉलीवूड – आठवत असल्याचे त्यांनी सांगितले. थायलंडच्या पर्यटकांना अजंता – वेरूळच्या लेण्यांबद्दल उत्सुकता असून थायलंड भारतामध्ये बुद्ध धर्मस्थळांचा समावेश असलेले ‘बुद्धिस्ट सर्किट’ विकसित करण्याकरिता प्रयत्न करीत असल्याचे त्यांनी राज्यपालांना सांगितले.भारत व थायलंड मध्ये जुन्या कलाकृतींच्या देवाणघेवाणी संदर्भात मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज वस्तू संग्रहालय व थायलंडच्या राष्ट्रीय संग्रहालय यामध्ये सामंजस्य करार झाल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. थाई मसाज तंत्र भारतात आणण्याच्या दृष्टीने ‘आयुष’ मंत्रालयासोबत चर्चा सुरु असल्याचे त्यांनी सांगितले.थायलंडचे मुंबईतील वाणिज्यदूत एकापोल पुल्पिपात यावेळी उपस्थित होते.