नव्या वर्षात ७० हजार कोटींचे आयपीओ

0
6

मुंबई-गेल्या सव्वा वर्षापासून भारतीय शेअर बाजारात तेजीने परतावा केल्यानंतर आता अनेक कंपन्यांनी विस्तारासाठी बाजारातून भांडवल उभारणी करण्याच्या दृष्टीने आयपीओ (इनिशियल पब्लिक आॅफर), समभाग विक्रीची प्रक्रिया सुरू केली असून २०१५ च्या वर्षात तब्बल ७० हजार कोटी रुपये मूल्याचे आयपीओ भारतीय शेअर बाजारात येणार आहे.

लहान-मोठ्या अशा सुमारे ४३ कंपन्यांनी भांडवली बाजार नियमन संस्था असलेल्या ‘सेबी’कडे भांडवल उभारणीच्या परवानगीसाठी आवश्यक प्रक्रिया सुरू केली असून फेब्रुवारीपर्यंत यापैकी बहुतांश कंपन्यांना हिरवा कंदील मिळेल, अशी माहिती आहे. देशात आगामी वर्षात रस्ते, वीज प्रकल्प, पायाभूत सुविधा प्रकल्प, हॉटेल सेवा, बांधकाम उद्योग, शेती प्रक्रिया उद्योग, ग्राहकोपयोगी वस्तु निर्मिती करणाऱ्या कंपन्या अशा काही कंपन्यांचा समावेश आहे. विशेष म्हणजे, चालू आर्थिक वर्षात केंद्र सरकारने नवरत्न, महारत्न अशा काही कंपन्यांतील निर्गुंतवणुकीची घोषणा यापूर्वीच करताना त्याद्वारे ४४ हजार कोटी रुपयांचे भांडवल उभारणी करण्याचे लक्ष्य निश्चित ठेवले होते. निर्गुंतवणुकीसाठी निश्चित केलेल्या सहापैकी तीन कंपन्यांच्या निर्गुंतवणुकीला भरभरून प्रतिसाद आल्याने बाजाराचेही मनोबल उंचावले आहे.