रेल्वेमध्ये एफडीआय आले तर, बेमुदत संप – एनएफआयआर

0
9

नागपूर – रेल्वेमध्ये परकीय गुंतवणूक आणण्याच्या केंद्र सरकारच्या प्रस्तावाला भारतीय रेल्वे कर्मचा-यांच्या राष्ट्रीय संघटनेने (एनएफआयआर) विरोध केला आहे. केंद्राने रेल्वेमध्ये परकीय गुंतवणूकीला मंजुरी दिली तर, यावर्षाच्या जूनपासून अनिश्चित काळासाठी संपावर जाण्याचा इशारा एनएफआयआरने दिला आहे.
ईस्ट इंडिया कंपनीने ज्या प्रमाणे सुरुवातीला भारतात प्रवेश केला आणि नंतर देशावर राज्य केले परकीय गुंतवणूकीमुळे रेल्वेचेही तसेच होईल. रेल्वेमध्ये परकीय गुंतवणूकीची अजिबात गरज नाही असे एनएफआयआरचे सरचिटणीस एम.रघविह म्हणाले.
रेल्वेच्या व्यवहार्य प्रकल्पांसाठी एफडीआयऐवजी रेल्वे कर्मचा-यांच्या भविष्य निर्वाह निधीमधून कर्ज घ्या आणि वेळेवर फेडा असा प्रस्ताव एनएफआयआरने रेल्वे मंत्रालयाला दिला आहे.
एनएफआयआरचा रेल्वेमधील एफडीआयला पूर्ण विरोध असून, आम्ही एफडीआय येऊ देणार नाही असे एम रघविंह यांनी सांगितले. सरकारला नव्या प्रकल्पांसाठी निधीची आवश्यकता असेल तर, एका ठराविक मर्यादेपर्यंत त्यांना कर्मचा-यांच्या भविष्य निर्वाह निधीचा उपयोग करता येईल असे रघविंह म्हणाले.
नव्या प्रकल्पांसाठी रेल्वे कर्मचा-यांच्या वेतनातून छोटी रक्कम कर्ज म्हणूनही कापून घेता येईल असे रघविंह यांनी सांगितले. या मुद्यावर केंद्रीय रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांची भेट घेतली असून, त्यांना रेल्वेमधील एफडीआयच्या धोक्याची कल्पना दिली आहे असे रघविंह यांनी सांगितले.