माझ्याविरोधात RSS आणि भाजपाचा कट, पण मी घाबरणार नाही- लालू

0
7

नवी दिल्ली, दि. 7 – केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागा(सीबीआय)नं राष्ट्रीय जनता दलाचे प्रमुख लालूप्रसाद यादव यांच्यावर बेनामी अ‍ॅक्टअंतर्गत कारवाई केली आहे. या कारवाईनंतर लालूप्रसाद यादव यांनी भाजपा आणि आरएसएसवर निशाणा साधला आहे. भाजपानं माझ्याविरोधात कट रचला आहे, पण तरीही मी घाबरणार नाही, असं लालूप्रसाद यादव म्हणाले आहेत. लालूप्रसाद यादव यांनी मोदी सरकारवर पलटवार केला आहे.

मला आणि माझ्या कुटुंबीयांना विनाकारण लक्ष्य केले जाते. भाजपा आणि आरएसएस मला बदनाम करण्याचा कट रचतायत. दबाव टाकून भाजपाला मला झुकवायचे आहे. मात्र मी कधीही कोणासमोर झुकणार नाही आणि मी यांना घाबरणारसुद्धा नाही. आम्ही मातीमोल झालो तरी चालेल, मात्र भाजपा सरकारला सत्तेपासून दूर केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही.बेनामी संपत्तीवर लालू म्हणाले, मी कोणत्याही प्रकारचा गैरव्यवहार केला नाही. 2006च्या रेल्वे कॅटरिंगच्या टेंडर प्रकरणात सीबीआयनं लालूप्रसाद यादवांसमवेत राबडी देवी, तेजस्वी यादव, सरला गुप्ता, आयआरसीटीसीचे तत्कालीन एमडी पी. के. गोयल, विजय कोचर, विनय कोचर यांच्यावर कलम 420 आणि 120 ब अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.