यूपीएकडून उपराष्ट्रपतिपदासाठी गोपाळकृष्ण गांधी यांना उमेदवारी

0
6

नवी दिल्ली, दि. 11 – काँग्रेसप्रणीत यूपीएकडून राष्ट्रपतिपदासाठी महात्मा गांधी यांचे नातू आणि पश्चिम बंगालचे माजी राज्यपाल गोपालकृष्ण गांधी यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. एएनआयने दिलेल्या वृत्तानुसार, 18 विरोधी पक्षांनी गोपालकृष्ण गांधी यांची उपराष्ट्रपतिपदासाठीचे उमेदवार म्हणून निवड केली आहे.
कॉंग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीदरम्यान गोपालकृष्ण गांधी यांना विरोधीपक्षाकडून उपराष्ट्रपतिपदाचे उमेदावर म्हणून निश्चित करण्यात आले होते. दरम्यान, राष्ट्रपतिपदाचे उमेदवार म्हणून सुद्धा गोपालकृष्ण गांधी यांच्या नावाची चर्चा झाली होती. मात्र, त्यांच्याऐवजी यूपीएकडून राष्ट्रपतिपदाचे उमेदवार म्हणून मीरा कुमार यांनी निवड केली आहे. तर, राष्ट्रीय लोकशाही आघाडीकडून रामनाथ कोविंद यांना राष्ट्रपतिपदाची उमेदवारी देण्यात आली आहे.
उपराष्ट्रपती हमीद अन्सारी यांची कारकीर्द 10 ऑगस्ट रोजी संपणार आहे. त्यामुळे उपराष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीसाठी 16 जुलैपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करता येणार असून 5 ऑगस्ट रोजी मतदान घेण्यात येणार आहे. तर, राष्ट्रपतिपदासाठी 17 जुलै रोजी निवडणूक होणार आहे.
दरम्यान, 22 एप्रिल 1945 मध्ये गोपाळकृष्ण गांधी यांचा जन्म झाला. त्यांनी इंग्रजी साहित्यात पदव्युत्तर पदवी संपादन केली आहे. गोपाळकृष्ण गांधी यांनी विविध देशांत राजदूत म्हणून काम पाहिलेले आहे. ते काही काळ राष्ट्रपतींचे सचिवही होते. दक्षिण आफ्रिका आणि श्रीलंकेत ते उच्चायुक्त होते. वर्ष 2004 ते2009 या कालावधीत ते पश्चिम बंगालचे राज्यपाल होते.