ओबीसी राष्ट्रीय महासंघाची बैठक संपन्न

0
8

येत्या ७ ऑगस्ट रोजी दिल्ली येथे ओबीसींचे महाअधिवेशन
ओबीसींच्या आरक्षण कपात धोरणाचा केला निषेध

नागपूर,दि.१६- मंडल आयोग दिनाचे औचित्य साधून येत्या ७ ऑगस्ट रोजी दिल्ली येथे आयोजित अखिल भारतीय ओबीसी महाअधिवेशनाच्या नियोजनाविषयी चर्चा करण्यासाठी नागपूर येथे राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या एका महत्त्वपूर्ण बैठकीचे आयोजन आज (दि.१६) करण्यात आले होते. या बैठकीत ओबीसीच्या आरक्षणामध्ये कपातीचे धोरण अवलंबिल्याने केंद्र सरकारचा निषेध करण्यात आला.
नागपूरच्या धनवटे नॅशनल कॉलेज येथे आयोजित या बैठकीच्या अध्यक्षस्थानी राष्ट्रीय महासंघाचे अध्यक्ष प्रा. बबनराव तायवाडे हे होते. यावेळी महासंघाचे राजकीय समन्वयक माजी खासदार डॉ.खुशालचंद्र बोपचे, निमंत्रक सचिन राजूरकर, वरिष्ठ सल्लागार प्रा. नागेश चौधरी, संजय पन्नासे, खेमेंद्र कटरे, नाना लोखंडे, खुशाल शेंडे, सेवानिवृत्त पोलिस उपअधीक्षक सुरेश लांबट, श्री. शेंडे, मनोज चव्हाण, नीलेश कोडे, उज्ज्वला महल्ले, श्रीमती वानकर, आशा आर्य, संजय भिलकर आदी पदाधिकारी उपस्थित होते.
या बैठकीत वैद्यकीय शिक्षण प्रवेशासंबंधी ओबीसींच्या आरक्षणात सरकारने केलेल्या कपातीसंबंधी चर्चा केंद्रस्थानी होती. सरकार ओबीसी समाजाविरुद्ध सुनियोजित पद्धतीने षडयंत्र करून त्यांना गुलामीच्या दरीत लोटण्याचे कारस्थान करीत असल्याचे मत या बैठकीत नोंदविण्यात आले. आरक्षणात सातत्याने कपातीचे धोरण स्वीकारत असल्याने सरकारचा निषेध या बैठकीत करण्यात आला.
येत्या ७ ऑगस्ट रोजी दिल्ली येथे होणाऱ्या राष्ट्रीय महाअधिवेशनाच्या आयोजनासंबंधी प्रदीर्घ चर्चा यावेळी करण्यात आली. दरम्यान, दिल्ली येथे होणाऱ्या महाअधिवेशनात एका स्मरणिकेचे प्रकाशन होणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली आहे. या स्मरणिकेत आपली व आपल्या प्रतिष्ठानाच्या जाहिराती प्रकाशित करण्याचे आवाहन यावेळी सर्व पदाधिकाऱ्यांनी केले आहे. राष्ट्रीय स्तरावर होणाऱ्या या आयोजनाचा आर्थिक डोलारा समर्थपणे पेलविता यावा, यासाठी समाजातील व्यक्तींनी सढळ हाताने मदत करण्याचे आवाहन सुद्धा या बैठकीच्या माध्यमातून करण्यात आले.
दिल्ली येथे होणाऱ्या महाअधिवेशनात जास्तीत जास्त संख्येने सहभागी होऊन आपली शक्ती सरकार दरबारी पोचविण्यासाठी सर्व ओबीसी आपली उपस्थिती दर्शविण्याचे आवाहन राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या वतीने करण्यात आले आहे.