जिल्ह्याचा मानवी विकास निर्देशांक वाढविण्यासाठी प्रयत्नशील- पालकमंत्री बडोले

0
17

गोंदिया- जिल्ह्याचा मागासलेपणा दूर करण्यासाठी शासनाच्या विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणी करुन जिल्ह्याचा मानवी विकास निर्देशांक वाढविण्यासाठी आपण प्रयत्नशील असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री राजकुमार बडोले यांनी केले.भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या ६५ व्या वर्धापन दिनाचा कार्यक्रम कारंजा पोलीस कवायत मैदान येथे संपन्न झाला. यावेळी ध्वजारोहणानंतर उपस्थितांना संबोधीत करतांना पालकमंत्री बडोले बोलत होते.
यावेळी आमदार गोपालसदास अग्रवाल, जिल्हाधिकारी डॉ.अमित सैनी, पोलीस अधीक्षक शशीकुमार मिणा, माजी आमदार डॉ.खुशाल बोपचे,भाजपा जिल्हाध्यक्ष विनोद अग्रवाल प्रमुख उप‍स्थित होते.पालकमंत्री बडोले म्हणाले, राज्याचा सामाजिक न्यायमंत्री म्हणून सामाजिक न्याय विभागाच्या विविध योजना लोकाभिमुख करण्यात येतील. स्पर्धा परीक्षांची तयारी करता यावी यासाठी तालुका व जिल्हा पातळीवर स्पर्धा परीक्षांचे मार्गदर्शन केंद्रे सुरु करण्यात येतील. जात वैधता प्रमाणपत्र एका महिन्याच्या आत संबंधित व्यक्तीला मिळावे यासाठी सोपी पद्धत अवलंबून प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी जात प्रमाणपत्र पडताळणी कक्ष स्थापन करण्यात येईल. नागरी परीक्षांच्या तयारी व मार्गदर्शनासाठी पुणे आणि नागपूर येथे कायमस्वरुपी मार्गदर्शन केंद्र सुरु करण्यात येईल.
सालेकसा तालुक्यातील पर्यटनस्थळ असलेल्या हाजराफॉल येथे साहसी पर्यटनासाठी निधीची तरतूद करण्यात आल्याचे सांगून पालकमंत्री बडोले म्हणाले, आदिवासी बांधवांचे आराध्य दैवत असलेल्या कचारगडच्या विकासासाठी निधी उपलब्ध करुन देण्यात आला असून यामधून सिमेंट पाथवे आणि पायèयांचे बांधकाम करण्यात येणार आहे. नक्षलग्रस्त भागातील सर्व ग्रामपंचायतींना पथदिवे बसविण्याचा कार्यक्रम सुरु असल्याचे त्यांनी सांगितले.
जिल्ह्यातील सुशिक्षीत बेरोजगार युवक-युवतींना रोजगार उपलब्ध व्हावा यासाठी कौशल्य विकास कार्यक्रम जिल्ह्यात प्रभावीपणे राबविणार असल्याचे म्हणाले. जिल्ह्यात गॅस ग्राहकांचे आधारकार्डशी सलग्न करण्याच्या प्रक्रियेत गोंदिया जिल्हा राज्यात पहिल्या क्रमांकावर आहे. जिल्हाधिकारी डॉ.अमित सैनी यांच्या संकल्पनेतून जिल्ह्यातील रोजगार व स्वयंरोजगार मार्गदर्शन केंद्राकडे नोंदणीकृत असलेल्या सुशिक्षीत बेरोजगार सेवा सहकारी संस्थांना जिल्हा कामवाटप समितीतर्फे सेतू केंद्राची कामे देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सेतू केंद्राबाबतच्या या धोरणाला राज्य शासनाने मान्यता दिली असून गोंदिया मॉडेल या नावाने ही कार्यपद्धती राज्यात राबविण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतल्याचे त्यांनी सांगितले.
जिल्ह्यातील नागरिकांचे रोजगारासाठी होणारे स्थलांतर थांबविण्यासाठी रोजगार हमी योजना यशस्वी ठरल्याचे पालकमंत्री बडोले म्हणाले. पाणीटंचाईवर मात करण्यासाठी जलयुक्त शिवाय अभियान या महत्वाकांक्षी उपक्रमात जिल्ह्यातील जनतेनी सहभागी व्हावे असे आवाहन केले.बांबू कारागिरांना चांगल्याप्रकारे या व्यवसायातून रोजगार उपलब्ध करुन देण्यासाठी अहमदाबाद येथील तांत्रिक मागदर्शनाखाली महत्वाकांक्षी प्रकल्प तयार करण्यात येत असून बांबू उत्पादनापासून ते प्रक्रिया त्यापासून नवनवीन उत्पादन आणि राष्ट्रीय स्तरावर मार्केटिंगची व्यवस्था करण्यात येणार असल्यामुळे या उद्योगाला नवी चालना मिळेल असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.
ध्वजनिधी संकलनामध्ये उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल जिल्हाधिकारी डॉ.अमित सैनी यांचा पुष्पगुच्छ व स्मृतिचिन्ह देवून पालकमंत्री बडोले यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. पोलीस सेवेतील गुणवत्तापूर्ण सेवेबद्दल राष्ट्रपती पदक जाहीर झाल्याबद्दल पोलीस निरीक्षक सुरेश भोयर, राष्ट्रपती शौर्य पथकाचे मानकरी पोलीस निरीक्षक राजेंद्रकुमार तिवारी, पोलीस उपनिरीक्षक संदिप म्हस्के, अविनाश गडाख, पोलीस हवालदार रमेश येडे, पोलीस नाईक वामन पारधी, राधेश्याम डोये, उमेश इंगळे तसेच सैनिक कल्याण विभागातर्फे सैनिकांच्या प्रफुल रहांगडाले, पुनम तुरकर व अशमा खान या पाल्यांचा सत्कार करण्यात आला.