विमा पॉलिसीलाही ‘आधार’, नाहीतर मिळणार नाही विम्याची रक्कम

0
15

नवी दिल्ली,दि.09(वृत्तसंस्था): मोबाइल नंबरला आधार कार्डसोबत जोडण्यावरून वाद सुरू असताना आता आणखी एक गोष्ट तुम्हाला आधार कार्डसोबत जोडावी लागणार आहे. विमा पॉलिसी आधारशी जोडणं सक्तीचं करण्यात आलं आहे. भारतीय विमा नियामक आणि विकास प्राधिकरणाने (आयआरडीएआय) सर्व विमा कंपन्यांच्या ग्राहकांच्या पॉलिसी आधार आणि पॅन क्रमांकाशी जोडण्याचे निर्देश जारी केले आहेत.

सर्व जुन्या आणि नव्या पॉलिसींसाठी हा नियम लागू होईल असं आयआरडीएआयने स्पष्ट केलं आहे. म्हणजे जर तुम्ही आधीपासून कोणती विमा पॉलिसी घेतली असेल किंवा तुम्हाला नवीन पॉलिसी काढायची असेल तरी पॉलिसीला आधारशी जोडणं बंधनकारक असणार आहे. मनी लॉंड्रिंगसारख्या प्रकरणांना लगाम लागावा हा आधारशी जोडणीमागे उद्देश असल्याचं सांगण्यात आलं आहे. या आदेशानंतर जो पॉलिसी धारक आपल्या पॉलिसीशी आधार आणि पॅन कार्ड जोडणार नाही त्याला त्या विम्याची रक्कम मिळणार नाही. आयआरडीएने 1जून 2017 च्या राजपत्रातील अधिसूचनेनुसार विमा कंपन्यासह सर्व आर्थिक सेवा प्रदात्यांना ग्राहकांचे आधार आणि पॅन कार्ड/ फॉर्म 60 जोडण्यास सांगितले आहे. संबंधित विमा कंपन्यांच्या कार्यालयात जाऊन किंवा मोबाइल संदेश किंवा ऑनलाइन आपले आधार आणि पॅन कार्ड जोडू शकतात. देशभरात सुमारे 29 कोटी लोकांनी जीवन विमा उतरवला आहे. तर 21 कोटी वाहन धारकांकडे विमा आहे. आरोग्य विमा धारकांची संख्याही मोठ्याप्रमाणात आहे.

 नुकताच सर्वोच्च न्यायालयाने बँका आणि मोबाइल सेवा पुरवणाऱ्या कंपन्यांना आधार क्रमांक जोडण्याबाबत लोकांमध्ये भीती निर्माण करणाऱ्या अफवा पसरवण्यावरून फटकारले होते. आधार कार्डशी निगडीत एका याचिकेवर सर्वोच्च न्यायालयातील खंडपीठासमोर सुनावणी सुरू आहे. न्यायालयाने बँका आणि मोबाइल कंपन्यांना ग्राहकांना आधार क्रमांकाशी जोडण्याबाबत अंतिम तारखेबाबत सातत्याने सूचना देण्यास सांगितले आहे.