काश्मिरात भारतावर प्रेम करणारा मोठा वर्ग असल्याचे केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांचे प्रतिपादन

0
7

यवतमाळ,दि.4 : जम्मू-काश्मिर भारताचे अविभाज्य अंग आहे. काश्मिरमध्ये भारतावर प्रेम करणारा मोठा वर्ग आहे. भारताची सुरक्षा यंत्रणा अतिशय बिकट परिस्थितीत दहशतवाद्यांशी लढा देत आहे. सैन्यातील अधिकारी व स्थानिक पोलिसांचे यात मोठे योगदान आहे. स्थानिक पोलिसांमध्ये जास्तीत जास्त जवान मुस्लीम समाजाचे आहेत. आपल्या मातृभूमीच्या सेवेसाठी ते सदैव तत्पर असतात. असे प्रतिपादन केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांनी केले.
यवतमाळ येथे एका वृत्तवाहिनीच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. मंचावर जिल्ह्याचे पालकमंत्री मदन येरावार, नगराध्यक्ष कांचन चौधरी, माजी मंत्री राजाभाऊ ठाकरे उपस्थित होते.
गत काही महिन्यांपासून काश्मिरमध्ये दगडफेक कमी झाली आहे, असे सांगून गृहराज्यमंत्री अहीर म्हणाले, दहशतवादी किंवा त्यांचे समर्थक जुन्या चित्रफिती दाखवून स्थानिकांना भडकविण्याचे प्रयत्न करीत असतात. प्रसार माध्यमातून बरेचदा काश्मिरबाबत जे दाखविले जाते ते पूर्ण सत्य असेलच असे नाही. काश्मिरच्या सकारात्मक बाबी कमी प्रक्षेपित होतात. आता काश्मिर बदलत आहे. केंद्र सरकार, गृह मंत्रालय, संरक्षण मंत्रालय, स्थानिक सरकार, स्थानिक पोलीस यांच्या समन्वय चांगला आहे. काश्मिरमधील चार हजार ५०० मुस्लीम स्त्रिया भारत सरकारच्या कौशल्य विकासाचे प्रशिक्षण घेत आहेत, या बाबी जनतेसमोर आल्या पाहिजेत. गत काही वर्षात घुसखोरी कमी झाली आहे, हे सरकारचे यश आहे. नक्षलवाद्यांनासुध्दा आपण चोख उत्तर देत आहोत. नक्षली कारवायांमध्ये २० ते २५ टक्के घट झाली आहे, असे ना.अहीर म्हणाले.