७0 लाखांचा बंधारा ठरतोय ‘पांढरा हत्ती’

0
18

अर्जुनी मोरगाव,दि.4ः- तालुक्यातील गाढवी नदीवर पाच गावातील मागणीचे महत्व लक्षात घेवून व पालकमंत्री राजकुमार बडोले यांच्या विशेष प्रयत्नाने बंधार्‍या बांधकामासाठी ७0 लाखाचा निधी मंजूर झाला. एक वर्षापूर्वी पाटबंधारे स्थानिक स्तरविभागाच्या वतीने पुष्पनगर ‘ब’ येथे बंधार्‍याचे बांधकाम झाले. परंतु, अधिकार्‍यांच्या नियोजनशून्य कारभार व ‘पाणी जिरवा’ अभियानामुळे हा बंधारा आजघडीला ‘पांढरा’ हत्ती ठरला आहे.
केशोरी परिसरातील शेतकर्‍यांची जिवनदायीनी म्हणून गाढवी नदीची ओळख आहे. या नदीतून वाहणार्‍या पाण्याची साठवणूक करून शेतीच्या सिंचन व पिण्याच्या पाण्यासाठी उपयोग व्हावा, या उद्देशाने परिसरातील केशोरी, पुष्पनगर ‘अ’, पुष्पनगर ‘ब’, वडेगाव व खोळदा यापाच गावातील शेतकर्‍यांना गाढवी नदीच्या तोंडा नाल्यावर बंधारा बांधण्याची मागणी गेले अनेक वर्ष करीत आहेत.
दरम्यानच्या काळात, ‘गाव तिथे मुक्काम’ या शासनाच्या योजनेअंतर्गत पालकमंत्री राजकुमार बडोले हे केशोरी येथे मुक्कामी असताना, शेतकर्‍यांनी आपलीचे महत्व त्यांना पटवून दिले. पालकमंत्र्यांनी देखील बंधार्‍याचा सिंचन व पिण्याच्या पाण्याचा उपयोग लक्षात घेवून, बंधार्‍याच्या मंजुरीकरीता विशेष प्रयत्न केले. दरम्यान बंधाराच्या बांधकामासाठी पाटबंधारे स्थानिक स्तर विभागाअंतर्गत ७0 लाखाचा निधी मंजूर झाला आणि एक वर्षापूर्वी बंधारा अस्तित्वात आला. पालकमंत्र्यांच्याच हस्ते या बंधार्‍याचे भूमिपूजन करण्यात आले. त्यामुळे पाच गातील जवळपास २00 हेक्टर शेतीला सिंचन आणि पुष्पनगर ‘ब’ व वडेगाव येथील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निकाली निघणार अशी आशा शेतकरी लावून होते.
परंतु, आजघडीला हा बंधारा पांढरा हत्ती ठरत असल्याचे दिसत आहे. अधिकार्‍यांच्या नियोजनशून्य कारभाराचे उत्तम नमुनाच पहायला मिळत आहे. पाणी अडविण्याकरीता बंधार्‍याला दरवाजेच नसल्याने, हा ‘बंधारा’ की ‘रपटा’ असा प्रश्न निर्माण होत आहे. जमीन व बंधार्‍याची उंची सारखीच दिसत असल्याने पाणी कसे अडणार हा देखील प्रश्न आहे. विशेष म्हणजे, सदर बांधकाम कोणत्या विभागाचे आहे, याचा फलक देखील येथे उपलब्ध नाही. यावरून अधिकार्‍यांची नियोजनशून्यता समोर येत असून अधिकार्‍यांनी फक्त ‘निधी जिरवा’ अभियान राबविल्याचा आरोप शेतकरी करीत आहेत.
अधिकार्‍यांनी कर्तव्यदक्षपणे बांधकामाचे नियोजन व त्यानंतरची प्रक्रिया राबविली असता तरी आजघडीला पाच गावातील शेतकरी या बंधार्‍यामुळे सुजलाम् सुफलाम् झाला असता. परंतु आजघडीला शेतकर्‍यांसाठी हा बंधारा पांढरा हत्ती ठरल्याने, या बंधार्‍याचे बांधकाम कशासाठी व कुणाच्या फायदासाठी करण्यात आले, असा संतप्त प्रश्न शेतकरी विचारीत आहेत.
सद्यस्थितीत बंधार्‍याच्या दुरावस्थेकडे कोणाचेच लक्ष नसलयाने, सदर बांधकामाची चौकशी होऊन दोषी अधिकार्‍यांवर कारवाई होणार काय ? याकडे पाचही गावातील शेतकर्‍यांचे लक्ष लागले आहे.