पोलीस कर्मचा-याने काँग्रेस खासदार कमलनाथ यांच्यावर ताणली बंदूक

0
10

छिंदवाडा(वृत्तसंस्था) दि. १६ : – येथील काँग्रेसचे खासदार कमलनाथ यांच्यावर त्यांच्याच सुरक्षेसाठी तैनात कॉन्स्टेबलने बंदूक रोखल्याची घटना शुक्रवारी घडली. मिळालेल्या माहितीनुसार, त्यांच्या सुरक्षेसाठी तैनात एका पोलीस कर्मचा-याने दोन वेळा त्यांच्यावर बंदूक ताणली होती. ऐनवेळी इतर पोलीस कर्मचा-यांनी धाव घेत रायफल रोखणा-या पोलीस कर्मचा-याला बाजूला सारले आणि मोठा अनर्थ टळला. सध्या कमलनाथ सुरक्षित आहेत. कमलनाथ छिंदवाडा येथे दौ-यावर गेले असताना ही घटना घडली.

छिंदवाडाचे अतिरिक्त पोलिस अधीक्षक निरज सोनी यांनी सांगितलं की, ‘काँग्रेस नेत्यावर त्यांच्या सुरक्षेसाठी तैनात एका पोलीस कर्मचा-याने बंदूक ताणली होती. सध्या ते सुरक्षित आहेत’. बंदूक रोखलेल्या पोलीस कर्मचा-याचे नाव रत्नेश पवार असल्याची माहिती मिळाली आहे. सध्या त्याच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. याप्रकरणी चौकशीचा आदेश देण्यात आला आहे. ‘एअरपोर्टवर कमलनाथ यांच्या सुरक्षेसाठी तैनात पोलीस कर्मचा-याने संशयीतपणे बंदूक रोखून धरली. आम्ही त्याला निलंबित केलं असून चौकशी सुरु आहे’, अशी माहिती छिंदवाडाचे अतिरिक्त पोलिस अधीक्षक निरज सोनी यांनी दिली आहे. चौकशीदरम्यान रत्नेश पवार याने आपण बंदूक एका खांद्यावरुन दुस-या खांद्यावर ठेवण्याचा प्रयत्न करत होतो असा दावा केला आहे. पोलिसांनी रत्नेश पवारची वैद्यकीय तपासणी केली आहे. सोबतच त्याचा जुना रेकॉर्ड तपासला जात आहे.

कमलनाथ हे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आहेत. 1980 पासून ते 9 वेळा खासदार म्हणून मध्यप्रदेशातील छिंदवाडा लोकसभा मतदारसंघाचं नेतृत्त्व करत आहेत. 16 व्या लोकसभेचे ते अध्यक्ष होते. केंद्रीय नगरविकास मंत्री, वाणिज्य आणि औद्योगिक मंत्री, वस्त्रोद्योग राज्यमंत्री, पर्यावरण आणि वन मंत्री अशा महत्त्वाच्या जबाबदाऱ्या त्यांनी केंद्रात पार पाडल्या आहेत.