राहुल गांधी म्हणाले, संविधान देशाचा पाया

0
6

नवी दिल्ली,दि.28(वृत्तसंस्था) – काँग्रेसचा आज (गुरुवारी) 133वा स्थापना दिवस आहे. या निमित्ताने राहुल गांधींनी प्रथमच काँग्रेस अध्यक्ष या नात्याने पक्षाच्या मुख्यालयात ध्वजारोहण केले. राहुल गांधींनी यावेळी संविधानाविरोधात दिल्या जाणाऱ्या वक्तव्यांप्रकरणी टीका केली. ते म्हणाले की, भारताने संघर्ष करून स्वातंत्र्य मिळवले होते. इतिहासाकडे वळून पाहता, संविधान तयार करणे हा अभिमानाचा क्षण होता. पण आज भाजपचे वरिष्ठ सदस्य याच्या विरोधात बोलत आहेत. भाजप राजकीय फायद्यासाठी खोटे बोलते अशी टिका त्यांनी केली.

भाजपचे केंद्रीय मंत्री अनंत कुमार हेगडे यांनी काही दिवसांपूर्वी एक वादग्रस्त वक्तव्य केले होते. संविधानातून आम्ही धर्मनिरपेक्ष हा शब्द हटवू शकतो असेही ते म्हणाले होते. हेगडे यांच्या वक्तव्यावरून बुधवारी संसदेच्या दोन्ही सभागृहात चांगलाच गदारोळ जाल्याचेही पाहायला मिळाले होते.या मुद्याला घेऊनच राहुल गांधी म्हणाले की, संविधानाचे संरक्षण ही काँग्रेस पक्षासह सर्व भारतीयांची ही जबाबदारी आहे. देशात आज जे काही घडत आहे ते योग्य नाही. पण आम्ही एकजुट होऊन लढू. संविधान या देशाचा पाया आहे आणि हा पायाच धोक्यात आहे. भाजपचे नेते विविध वक्त्यांनी थेट संविधानावर हल्ला चढवत आहेत.  देशात बनावटपणाचे जाळे पसरवले जात आहे. भाजप या बेसिक आयडियावर काम करते की, राजकीय फायद्यासाठी खोटेपणाचा वापर करता येतो. त्यांच्यामध्ये आणि आपल्यामध्ये हाच फरक आहे. असे होऊ शकते की आपण चांगली कामगिरी करणार नाही. कदाचित आपला पराभवही होईल. पण आपण सत्याची बाजू सोडायची नाही असा सल्ला काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्त्यांना दिला.