महाविद्यालयांमधील सौंदर्यस्पर्धांवर बंदी टाका – हायकोर्ट

0
18

वृत्तसंस्था
चेन्नई, दि. ६ – महाविद्यालयांमधील फेस्टिव्हल्समध्ये होणा-या सौंदर्य स्पर्धांवर बंदी घालावी असा आदेश चेन्नई हायकोर्टाने तामिळनाडू सरकारला दिले आहेत. रॅम्पवर चालून विद्यार्थ्यांचे काय भले होऊ शकते असा परखड सवालही हायकोर्टाने उपस्थित केला आहे.
अम्मा दुराई अभियांत्रिकी विद्यालयातील सौंदर्य स्पर्धेविरोधातचेन्नई हायकोर्टात लक्ष्मी सुरेश यांनी याचिका दाखल केली होती. लक्ष्मी सुरेश यांची मुलगी महाविद्यालयातील सौंदर्यस्पर्धेत सहभागी झाली होती. या स्पर्धेत तिने विजेतेपदही पटकावले मात्र आयोजकांनी तिला मिळणा-या पुरस्काराची पूर्ण रक्कम तिला दिलीच नव्हती. तसेच तिला दिलेले प्रमाणपत्रही बोगस होते. या फसवणूकीमुळे झालेल्या त्रासाची नुकसान भरपाई म्हणून आयोजकांनी ५ लाख रुपये द्यावे अशी मागणी लक्ष्मी सुरेश यांन केली होती. या याचिकेवरील सुनावणी दरम्यान न्या. टी.एस. शिवांगम यांनी तामिळनाडूमधील सर्वच महाविद्यालयांमधील सौंदर्यस्पर्धांमध्ये सहभागी होण्यास बंदी घालावे असे आदेश राज्य सरकारला दिले. न्या. शिवांगम म्हणाले, राज्यातील एवढ्या जुन्या विद्यापीठामध्ये चांगला दिसणारा मुलगा किंवा मुलगी अशा स्वरुपाची स्पर्धा आयोजित करण्याचे गरज काय ?. अशा स्वरुपाचे कार्यक्रम विद्यापीठाच्या देखरेखीखाली पार पडतात का, या कार्यक्रमांवर विद्यापीठाचे नियंत्रण आहे का, त्यासाठी विद्यापीठाने काही नियमावली तयार केली आहे का, अशा कार्यक्रमांसाठी निधी कसा आणला जातो असे प्रश्नही हायकोर्टाने उपस्थित केले. यासर्व मुद्यांवर विचारविनीमय होईपर्यंत राज्याच्या शिक्षण विभागाने सर्व महाविद्यालयांमध्ये सौंदर्य स्पर्धा आयोजित करण्यास अथव चांगला दिसणारा मुलगा किंवा मुलगी अशा स्वरुपाची स्पर्धा घेण्यास बंदी टाकावी असे हायकोर्टाने स्पष्ट केले.