भारतात विकासाच्या केंद्रस्थानी तरूण – मोदी

0
8

चाकण – देशात सध्या तरुणांना विकासासाठी भरपूर नवीन संधी आहेत. विकासाच्या केंद्रस्थानी भारताचा तरूण असून, आपल्याकडील तरुणांमध्ये प्रचंड कौशल्य आहे. कौशल्य आणि तंत्रज्ञान याची सांगड घालून तरुणांमध्ये अर्थव्यवस्थेची प्रगती करण्याची ताकद असल्याचे, आज (शनिवार) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले.

चाकण येथील जनरल इलेक्‍ट्रिक्‍सच्या (जीई) या प्रकल्पाचे उद्‌घाटन पंतप्रधान मोदींच्या हस्ते झाले. यावेळी राज्यपाल विद्यासागर राव, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पुण्याचे पालकमंत्री गिरीष बापट आदी मान्यवर उपस्थित होते.

मोदी म्हणाले, ‘‘औद्योगिक प्रगतीमध्ये तरुणांचे स्वागत आहे. 21 वे शतक हे आशियाचे असावे, अशी माझी आशा आहे. त्यात भारताचा वाटा मोठा असेल, असा मला विश्वास आहे. आज जगात सर्वांत वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था म्हणून भारताकडे पाहण्यात येत आहे. यामध्ये आपल्याला आणखी वाढ करण्याची संधी आहे. शेती, सेवा व उत्पादन निर्मिती या तिन्ही सेक्टरमध्ये वाढ होणे आवश्यक आहे. भारताच्या विकासाची जगभर चर्चा होत आहे. जगभरातील व्यापाऱ्यांचे भारताकडे लक्ष आहे. आपल्याकडील युवकांकडे असलेल्या कौशल्यामुळे त्यांच्यात जगभरातील पैसा खेचून आणण्याची क्षमता आहे. गेल्या काही दिवसांत ‘मेक इन इंडिया‘च्या माध्यमातून खूप पाऊले उचलण्यात आली आहेत. सरकारी नियम आणि अटी यामुळे औद्योगिक क्षेत्रात कंपन्या स्थापन करण्यासाठी अनेक परवानग्या घ्याव्या लागत होत्या. आता, देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने यातील अनेक नियम कमी केले आहेत. सुशासन हे प्रगतीसाठी आवश्यक आहे. युवाशक्ती जोरावर भारतीय अर्थव्यवस्था मोठी उंची गाठेल, असा मला विश्वास आहे.‘‘