तुमच्या गळाभेटीचं आम्ही काय समजायचं- ‪ नानांचा सवाल

0
12

मुंबई- तुम्ही एकमेंकावर आरोप-प्रत्यारोप करणार. त्यातून आम्ही कोणाला मतदान करायचे हे ठरवतो. आम्ही तुम्हाला भाबडेपणानं मतदान केले पण तुम्ही आता आमच्यात काही वितुष्ट नाही असे सांगून गळ्यात गळे घालून फिरणार असाल तर ते कसं पचवून घ्यायचं असा रोकडा सवाल अभिनेते नाना पाटेकर यांनी विचारला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज शरद पवारांच्या निमंत्रणावरून बारामतीच्या दौ-यावर आले आहेत. याबाबत राजकीय व सामाजिक स्तरातून विविध प्रतिक्रिया उमटत असतानाच नाना यांनी भाजप-राष्ट्रवादीवर रोखठोक भाष्य केले आहे. आयबीएन-लोकमत या वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत नानांनी पवार-मोदींवर हा प्रहार केला आहे. तुमचे हे असेच चालणार असेल तर लोक मनसे, शिवसेना व एमआयएमला मतदान केल्याशिवाय राहणार नाहीत असेही नानांनी सुनावले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज बारामतीत दाखल झाले आहेत. यावेळी मोदी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासमवेत एकाच व्यासपीठावर येतील. त्यानंतर मोदी पवारांच्या निवासस्थानी भोजनासाठी जाणार आहेत. 2014 मध्ये झालेल्या लोकसभा व विधानसभा निवडणुकीदरम्यान या दोन्ही बड्या नेत्यांनी एकमेंकावर जहरी टीका केली होती. पवारांनी मोदींवर टीका करताना म्हटले होते की, मतदारांनो, तुम्ही अर्ध्या चंडी घातलेल्या लोकांच्या हातात देश द्यायला निघाला आहात का? तर, मोदींनीही बारामतीत जाऊन शरद पवार व अजित पवारांवर हल्लाबोल करताना, बारामतीकरांनो चुलत्या-पुतण्याच्या गुलामगिरीतून बाहेर पडा अशी टीका केली होती. मात्र, चार-पाच महिन्याच्या आतच हे दोन नेते एकाच व्यासपीठावर आले आहेत. या भेटीबद्दल राजकीय वर्तुळात अनेक तर्क-वितर्क लढवले जात असतानाच नानांनी मोदींसह पवारांवर प्रहार केला आहे. नाना पाटेकरांची पवारांशी खास जवळीक आहे व स्नेहही आहे. तरीही त्यांनी अशा पद्धतीच्या राजकारणामुळे जनतेने कोणावर व आणि कसा विश्वास ठेवावा असे सांगत रोखठोक प्रहार केला आहे.